राज्यात पावसाचा जोर वाढणार
नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. गरब्यावर पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे या नवरात्रीतही पावसाचा मुक्कम राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ४८ तास राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. यानंतर हळूहळू पावसाचा जोर कमी होईल. मात्र, विदर्भामध्ये २७-२८ सप्टेंबरपर्यंत पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
advertisement
पालघर, ठाणे आणि मुंबईत आज मुसळधार पाऊस राहील. तर पुढचे तीन दिवस हळूहळू पाऊस कमी होत जाईल. घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्र, तळ कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये 48 तास वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सोलापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश्यं पाऊस झाला. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. गुडघाभर पाणी शेतात आणि घरांमध्ये शिरलं आहे. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीनं पंचनामे करुन मदत जाहीर करावी असं शेतकरी आवाहन करत आहेत. हळद, कांदा लावलेलं पिक अति मुसळधार पावसाने सडलं आणि त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे.
परतीचा मान्सून लांबणीवर
या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणीवर पडणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास ५ ते १० ऑक्टोबरदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे अजून काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहील.