उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख प्रशासनावर वचक असलेला नेता अशी आहे. मंत्रालय असो की कोणते जिल्हाधिकारी कार्यालय, विकासकामांची पाहणी असो की अजून दुसरे ठिकाण... अधिकाऱ्यांवर ओरडणारे, त्यांच्यावर डाफरणारे अजित पवार अनेकदा पाहायला मिळतात. सर्वसामान्यांच्या कामांसाठी अधिकाऱ्यांवर चिडणारे अजित पवार सगळ्यांना चांगलेच वाटतात. पण ज्यावेळी कायद्यावर बोट ठेवणारे अजित पवार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी कायदाच पायाखाली तुडवात आणि महिला आयपीएस अधिकाऱ्याला चक्क दम देतात तेव्हा अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी चांगले काम कसे करायचे आणि कधी करायचे? असे प्रश्न निर्माण होतात.
advertisement
त्याचे झाले असे की करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या. मात्र स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. आत्ताच्या आत्ता कारवाई थांबवा, असा आदेश अजित पवार यांनी दिला. त्यावेळी मी आपल्याला ओळखले नाही. तुम्ही माझ्या नंबरवर व्हिडीओ कॉल करा, असे अंजना कृष्णा अजित पवार यांना म्हणाल्या. त्यावर तुमच्यात एवढी हिम्मत आली... तुमच्याविरोधात मी कारवाई करेन, असा दम अजित पवार यांनी दिला. दोघांमधल्या संवादाची चित्रफीत राज्यात वेगाने पसरत आहेत. अजित पवार यांना भिडलेली महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण, असे विचारले जात आहे.
अजित पवार यांना भिडलेली महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण?
अंजना कृष्णा या मुळच्या केरळ राज्यातील आहेत. सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक आहेत. अतिशय शिस्तीच्या, कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
अंजना कृष्णा या २०२२-२०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सनदी सेवा परीक्षेत देशातून ३५५ व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या. काही वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार, अंजना कृष्णा यांच्या वडिलांचा छोटासा कापड व्यवसाय आहे. त्यांच्या मातोश्री या केरळच्या सखीना येथील न्यायालयात टायपिंगचे काम करतात. अंजना कृष्णा यांनी लहानपणी प्रचंड गरिबी पाहिलेली आहे. अतिशय गरिबीत वाढलेल्या, शिक्षण घेतलेल्या आणि स्वत:च्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांचा इथपर्यंतचा प्रवास झाला.
अंजना कृष्णा यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट मेरीज सेंट्रल स्कूल येथे झाले. तिरुवनंतपुरम येथे त्यांनी उच्च शिक्षण घेतले. नीरामंकरा येथील एनएसएस कॉलेजमधून गणित विषयात त्यांनी पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सन २०२२-२०२३ परीक्षेत त्यांनी देशातून ३५५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्या भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्या.
कारकीर्दीच्या सुरुवात त्यांनी केरळमध्ये त्रिवेंद्रम येथे एसीपी म्हणून केली. त्यानंतर त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यात. आधी पंढरपूर आणि आता करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून त्या काम पाहत आहेत.