७२ जागांवर विजय
नाशिक महापालिकेवर भाजपने यंदा अभूतपूर्व यश मिळवत सत्ता प्रस्थापित केली आहे. १२२ जागांपैकी तब्बल ७२ जागा जिंकत भाजपने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होणार, याबाबत कोणतीही शंका उरलेली नाही. मात्र महापौरपद कोणत्या आरक्षित प्रवर्गासाठी जाणार आणि त्या प्रवर्गातून कोणत्या नगरसेविकेच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
advertisement
येत्या आठवड्यात आरक्षणाची सोडत होणार?
मिळालेल्या माहितीनुसार, महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता आहे. ही सोडत मुंबई येथे राज्यस्तरीय पातळीवर पार पडणार असून, त्यानंतर नाशिकचे चित्र स्पष्ट होईल. सध्याच्या चर्चेनुसार नाशिकला पुन्हा एकदा महिला महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद ओबीसी किंवा अनुसूचित जाती (एससी) महिला प्रवर्गासाठी राखीव राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आरक्षणाची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच भाजपकडून महापौरपदासाठी उमेदवार निश्चित केला जाणार आहे. मात्र त्याआधीच पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. अनेक इच्छुक नगरसेविका आणि नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, लॉबिंगचे राजकारण तापले आहे.
सिंहस्थ मेळ्यामुळे महापौरपदाला वाढले महत्त्व
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या महापौरपदाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंहस्थ मेळ्याच्या नियोजन, विकासकामे आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यामध्ये महापौरांची भूमिका निर्णायक असते. त्यामुळेच या वेळी महापौरपदासाठीची चुरस अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत आहे.
२०१७ मध्ये कसं होत राजकीय समीकरण?
२०१७ मध्येही नाशिक महापालिकेत महापौरपदाची निवड दोन टप्प्यांत झाली होती. पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होते. त्या वेळी भाजपकडे ६६ नगरसेवक होते आणि ज्येष्ठ नगरसेविका रंजना भानसी यांना महापौरपद मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आणि सतीश कुलकर्णी महापौर झाले होते. यंदाही अशाच पद्धतीने दोन टप्प्यांत महापौर निवड होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील महापौरांची परंपरा
नाशिक महापालिकेत आरक्षण पद्धत १९९७ नंतर लागू झाली. त्यानंतर वसंत गिते, अशोक दिवे, डॉ. शोभा बच्छाव, दशरथ पाटील, बाळासाहेब सानप, विनायक पांडे, नयना घोलप, अॅड. यतीन वाघ, अशोक मुर्तडक, रंजना भानसी आणि सतीश कुलकर्णी यांनी महापौरपद भूषविले आहे. आता या यादीत पुढील महापौर कोण असणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
