या भेटीनंतर आता प्रशांत जगताप यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्यावर त्यांनी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीसोबतच पुणे महापालिकेची निवडणूक लढणार आहे. राष्ट्रवादी अजित पवारांसोबत जाण्याचा कसलाही इरादा नाही, अशा स्पष्ट शब्दात प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की, "आज पवार साहेबांची भेट घेतली. त्यांनी भेटीसाठी वेळ दिला होता. त्यांच्यासोबत पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा झाली. पुणे महानगरपालिकेत कशी लढत राहील? आपण महाविकास आघाडी सोबत लढलो तर काय होईल? किंवा इतर लोकांसोबत युती केली तर काय होईल? याचा लेखाजोखा आम्ही पवार साहेबांसमोर मांडला."
advertisement
सविस्तर चर्चा झाल्यानंतर शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, पुण्यात आणि राज्यात आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढू. याबाबत शरद पवार प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी देखील बोलले आहेत. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असल्याचं सांगितलं आहे. शरद पवार किंवा पक्षाचा वेगळा विचार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ, याबाबतची अधिकृत घोषणा शशिकांत शिंदे करतील, असंही जगताप यांनी सांगितलं.
