मुंबईत 'बिगेस्ट बुक सेल'! 100 पेक्षा अधिक स्टॉल्स अन् 70% पर्यंत सूट; वाचकांना लॉटरी, Video
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Mahaparinirvan Din 2025: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिनानिमित्त विविध प्रकाशनांनी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. 5 आणि 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी परिसरात तसेच छत्रपती शिवाजी पार्कवर 100 पेक्षा अधिक पुस्तक विक्रीचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनुयायांनी हे स्टॉल लावले असून वर्धा, नागपूर, पुणे, नाशिकसह अनेक जिल्ह्यांतील व्यापारी आणि वाचकांची मोठी गर्दी दिसत आहे.
या स्टॉलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महत्त्वाच्या ग्रंथांसह समाजसुधारणा, इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र आणि साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. शूद्र पूर्वी कोण होते?, हिंदू कोड बिल, प्रॉब्लेम ऑफ रुपी, माझी आत्मकथा, अस्पृश्य मूळचे कोण?, हिंदू धर्मातील कूट प्रश्न यांसारखी महत्त्वपूर्ण पुस्तके वाचकांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. याचबरोबर अॅड. हरिभाऊ पगारे लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कौटुंबिक जीवन, ज्योतिराव फुले यांचे गुलामगिरी, कॉ. शरद पाटील यांचे मुक्ती कोण पथे, मध्यमयुगीन भारताचा इतिहास, महाराष्ट्र एक भाषावार प्रांत, ऊठ मराठ्या ऊठ, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे यांसारखी अनेक पुस्तकेही उपलब्ध आहेत.
advertisement
वाचकांसाठी विविध प्रकाशनांनी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. मावळाई प्रकाशन, पुणे येथे 20 ते 25 टक्के सूट दिली जात आहे, तर सुधीर प्रकाशन, वर्धा येथे सर्व पुस्तकांवर 30 ते 70 टक्क्यांपर्यंत मोठी सूट मिळत आहे. मुंबईतील केतकी प्रकाशनकडून 15 टक्के तर इतर स्टॉलमध्ये साधारण 10 टक्के सूट देण्यात आली आहे. पुस्तकांची किंमत 20 रुपयांपासून सुरू होऊन 500 ते 600 रुपयांपर्यंत आहे त्यामुळे सर्व स्तरातील वाचकांसाठी खरेदीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.
advertisement
बाबासाहेब आणि पुस्तकांचे अतूट नाते सर्वविदित आहे. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या महामंत्राने प्रेरित होऊन लाखो अनुयायी महापरिनिर्वाण दिनी पुस्तक खरेदीला विशेष महत्त्व देतात. या पुस्तक स्टॉल्सवर सर्व वयोगटांचे लोक, विद्यार्थी, युवा, वडील-आई, कुटुंबं गर्दी करतात. बरेच पालक मुलांसाठी शिक्षण व समाजसुधारणा या विषयांची पुस्तके घेण्यासाठी येतात.
या पुस्तक मेळ्याचा आनंद घेण्याची संधी आज म्हणजे 6 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी पार्क येथे उपलब्ध आहे. वाचन-संस्कृतीला चालना देणारा हा उपक्रम असल्यामुळे इच्छुक वाचक आणि कुटुंबीयांनी या मेळ्याचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांमार्फत करण्यात येत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2025 11:11 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत 'बिगेस्ट बुक सेल'! 100 पेक्षा अधिक स्टॉल्स अन् 70% पर्यंत सूट; वाचकांना लॉटरी, Video

