अशाच प्रकारे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पण इथं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. येत्या काळात राष्ट्रवादी शरद पवार गट भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होईल. रोहीत पवार राज्यात मंत्री बनतील. तर सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रीपदाची जबाबदारी दिली जाईल, अशा चर्चा सुरू आहेत. यावर आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीनंतर शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएत सामील होणार का? रोहित पवार राज्यात मंत्री होतील का? सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, या चर्चा मी व्हॉट्सअप ग्रुपवर वाचल्या आहेत. मात्र, मी त्या चर्चांबाबत फार विचार करत नाही. जे माझ्या कामाच्या बाहेर आहे. त्याचा विचार मी कशाला करू? मी वास्तवात जगत असते. एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांना मत मांडण्याचा अधिकार आहे, त्यामुळे लोक वेगवेगळ्या माध्यमातून मते मांडत असतात. लोक काय बोलतात, लोक पक्षाबाबत काय बोलतात, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत, या ऐकून घ्यायच्या असतात, असे सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार का?
सुप्रिया सुळे या केंद्रात मंत्री होणार, या चर्चेबद्दल विचारलं असता सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, याचं उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, 11 वर्षांपासून मी चर्चा ऐकते. लोक बोलत असतात, पण आपण आपले काम करत राहायचे. बारामतीच्या लोकांनी खूप विश्वासाने मला निवडून दिले आहे. त्यामुळे माझी पहिली जबाबदारी माझ्या मतदारसंघातील मूलभूत सुविधा सोडवणे आहे. लोकांनी मला ज्या कामांसाठी दिल्लीत पाठवले ते काम मी पूर्ण केले पाहिजे, ते काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे, असंही सुळे यांनी म्हटलं.
