सिंधुदुर्ग : लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी गेलेल्या तरुणीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तळवडे-आंब्रेड मार्गावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात फोंडाघाट गांगोवाडी येथील निकिता दिलीप सावंत (28) हिचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला आहे. मुंबईतील गोरेगाव पूर्व नागरी निवारा परिषद कॉलनीत ते राहत होते.
advertisement
फोंडाघाट गांगोवाडी येथील दिलीप सावंत यांची मुलगी निकिता सावंत ही आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावाकडे आली होती. मात्र, रविवारी सकाळी आपल्या सख्ख्या भावासोबत मामाकडे पत्रिका देऊन परत येताना दुर्दैवी एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात निकिता हिचा मृत्यू झालाय.
३ फेब्रुवारीला होतं लग्न
निकिता हिचं लग्न ३ फेब्रुवारीला होणार होतं, पत्रिका देखील छापण्यात आली होती. पण त्या आनंदाच्या क्षणांपूर्वीच काळाने हा निर्दयी घाव घातला आहे. याबाबत माहिती अशी की दोन दिवसांपूर्वीच मुंबईवरून आपल्या आजोळी लग्नाची पत्रिका कुलदेवतेला ठेवायला आली होती. त्यानंतर आपल्या मामाकडे लग्नाची पत्रिका देण्यासाठी आपल्या सख्ख्या भावासोबत दुचाकीने मामाच्या घरी जात होती. कसवन तळवडे येथून येत असताना आंबरडच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बस अचानक समोर आल्याने भाऊ वैभव दिलीप सावंत याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यावर स्लिप झाली.
कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या अपघातात दोघेही गाडीवरून खाली पडली यानंतर तिला त्याच एसटी बसमधून आम्रड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर कणकवली येथील एका खाजगी रुग्णालयात तिला नेण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला ग्रामीण रुग्णालयातही नेण्यात आले तत्पूर्वी तिची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी दुचाकी चालक वैभव दिलीप सावंत याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.