बीडच्या परळीत तरुणाचे अपहरण करून टोकवाडी परिसरात अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १० ते १२ तरुण लाकडी काठी, बेल्टने एका तरुणाला अमानुषपणे मारहाण करत आहेत. हा तरुण वेदनांनी विव्हळत आहे, पण एक एक करून हे तरुण त्याला लाथा बुक्याने मारहाण करत आहे. यात एक तरुण हा मारहाण करताना चित्रीकरण देखील करत असल्याचं दिसून येत आहे. मारहाण झालेला तरुण लिंबोटा येथील शिवराज दिवटे असल्याचं समोर आलं आहे.
advertisement
मारहाणी तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. जलालपूर येथून अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमावरून परतताना शिवराज दिवटे याचं अपहरण करून मारहाण केली. मारहाण करतानाचा व्हिडीओ शूट करून व्हायरल केला. यामुळे अशी मारहाण करून नेमकी दहशत कोणाला दाखवायचे असा प्रश्न उपस्थित होतो.
यात मारहाण करणारा समाधान मुंडे, आणि आदित्य गित्ते असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आदित्य गित्ते हा गोटया गित्तेचा सख्या भाऊ आहे. यांच्यावर या अगोदर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आदित्य गित्तेचा वाल्मिक कराड सोबतचा फोटो समोर आला आहे. नेमका वाल्मिक कराड जेलमध्ये असताना परळी परिसरात दहशत माजवणारे पोरं कोणाची असा प्रश्न उपस्थित होत आहे. समाधान मुंडे या तरुणाने या अगोदर जलालपूर येथील एका युवकाला मारहाण केल्याची तक्रार दिली. या मारहाण प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
