TRENDING:

Love In Local : प्रेम शरीराशी होतं का मनाशी....? ईराला पाहून विचारात गुंतलेल्या ओंकारला अखेर उत्तर मिळालं

Last Updated:

ट्रेन थांबली, गर्दी अजून वाढली. ओंकारने तेव्हा पाहिलं की ती मुलगी थोडी लंगडत उभी आहे. सुरुवातीला वाटलं गर्दीत कुणाचा पायावर पाय पडला असेल बिचारी... पण जसजशी ती दरवाजाकडे सरकली, तसं ओंकार गोंधळला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रात्रीचे 9 वाजले होते....
Love in local
Love in local
advertisement

गोरेगाव स्टेशनकडे रिक्षाने जाताना ओंकारच्या अंगात थकवा ओसंडून वाहत होता. दिवसभर ऑफिसमध्ये बसून केलेल्या कामाचा परिणाम चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. रिक्षा स्टेशनवर पोहोचली, भाडं दिलं आणि तो गर्दीत मिसळला.

AI Generated Photo

प्लॅटफॉर्म नेहमीप्रमाणे गजबजलेला. चहाच्या टपऱ्यांवर लोक रांगेत उभे, कुणी कागदात वडापाव घेऊन धावतंय, कुणी मोबाईल कानाला लावून ओरडत. ट्रेनच्या शिटक्यांनी संध्याकाळ अजूनच आवाजाने भरून गेली होती.

advertisement

ओंकारने विरारकडे जाणारी लोकल पकडली. तो ज्या डब्यात शिरला, तो सामान्य होता आणि त्याच्या अगदी बाजूला अपंग प्रवाशांसाठी राखीव डबा होता. दोन्ही डब्यांच्यामध्ये रेलिंग असल्यामुळे दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना पाहू शकत होते.

AI Generated Photo

advertisement

गर्दी इतकी होती की बसायला जागा तर सोडाच, उभं राहणंही अवघड झालं होतं. खांद्याला खांदा लागून लोक उभे होते. तोल सांभाळण्यासाठी ओंकारने वरच्या रॉडला घट्ट पकडलं. त्यावेळी त्याच्या मनात मात्र एकच विचार होता, “किती दिवस असंच चालणार, किती दिवस आपण असं आयुष्य जगणार? तोच गोंधळ, तोच गोंगाट, आणि मी नेहमीसारखा थकलेला. आयुष्य असंच चालणार का? बस झालं आता आयुष्याचाच कंटाळा आलाय”

advertisement

ट्रेन सुरू झाली. ओंकारने खिडकीबाहेर नजर वळवली. अंधाऱ्या आकाशात दिव्यांचे धूसर ठिपके मागे सरकत होते. तेवढ्यात त्याच्या नजरेला समोरच्या डब्यातली एक तरुणी दिसली.

भाग 2 : पहिली नजर

AI Generated Photo

ती तरुणी साध्या सलवार–कुर्त्यात होती. हलक्या निळ्या दुपट्ट्याने खांदे झाकलेले, केस नीट बांधलेले, चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा पण डोळ्यात चमक होती. गर्दीत बसलेली असूनही तिच्या डोळ्यांत आत्मविश्वास चमकत होता. ओंकारनं तिला पाहिलं आणि त्याच्या अंगातील दिवसभराचा थकवा जसा नाहीसा झाला. ओंकारचं लक्ष तिच्याकडे खिळून राहिलं.

advertisement

काही क्षण तशीच नजरानजर झाली. ती मुलगी लाजल्यासारखी नजर चुकवू लागली, पण ओंकारचे डोळे मात्र हटायला तयार नव्हते.

ट्रेन थांबली, गर्दी अजून वाढली. ओंकारने तेव्हा पाहिलं की ती मुलगी थोडी लंगडत उभी आहे. सुरुवातीला वाटलं गर्दीत कुणाचा पायावर पाय पडला असेल बिचारी... पण जसजशी ती दरवाजाकडे सरकली, तसं ओंकार गोंधळला.

AI Generated Photo

तिच्या पायाखालून चमकणारा कृत्रिम पाय म्हणजेच प्रोस्थेटिक, त्याला तो स्पष्ट दिसला.

ओंकार थोडा थबकला. त्याच्या मनात एकाच वेळी हजारो प्रश्न उभे राहिले, “इतकी सुंदर असूनही देवाने असं का केलं असेल? मी तर तिच्या डोळ्यात हरवून गेलो आहे…हिला पाहून खूप भारी वाटलं, मन हलकं झालं... हे असंच असतं का प्रेम?"

पुढे त्याने स्वत:ला समजावत म्हणाला, " काय विचार करतोय ओंकार, या नात्याला भविष्य आहे का? पुढे काय? समाज काय म्हणेल? आई-वडील मान्य करतील का?”

त्या क्षणी ट्रेन थांबली. ती मुलगी उतरली आणि निघूनही गेली. ओंकारच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा तरंगत राहिला. तो स्वत:लाच विचारु लागला. "अरे या मुलीचा चेहरा मला सारखा का आठवतोय? ना ओळख ना पाळख... माझं मन तिच्याकडे का आकर्षीत होतंय? ती निघून गेली हे मला का सहन होत नाही आहे?"

भाग 3 : ओंकारची गोंधळलेली रात्र

AI Generated Photo

रात्री ओंकार घरी पोहोचला. घरात आई टीव्हीवर मालिकेत गुंग होती, वडील वृत्तपत्र वाचत होते. पण त्याच्या मनात मात्र गोंधळाचा वादळ उसळत होतं. झोपायच्या आधी तो स्वतःशीच पुटपुटला "ही एखादी क्षणिक भुरळ आहे का खरंच प्रेम? इतक्या लवकर कुणावर असं मन का जडावं?"

AI Generated Photo

उशीवर पडल्यावरही त्याच्या डोळ्यासमोर तिचाच चेहरा. ते निरागस डोळे, शांत हसू आणि… तो कृत्रिम पाय.

त्याला प्रश्न पडला "मी तिला मनापासून स्वीकारू शकेन का? की समाज, नातेवाईक यांच्या भीतीपोटी मागे हटेन? आई-वडील काय म्हणतील? मित्र काय थट्टा करतील?"

गोंधळलेल्या विचारांनी झोप उडून गेली. पण शेवटी थकव्याने डोळे मिटले. तरी स्वप्नातही तोच चेहरा, तोच नजरेचा क्षण.

भाग 4 : पुन्हा तीच भेट

AI Generated Photo

दुसऱ्या दिवशी ओंकारने नेहमीसारखाच डबा पकडला. मनात एक विचित्र ओढ होती “कदाचित ती पुन्हा दिसेल.”

सुरुवातीला ती दिसली नाही. ट्रेन पुढे सरकत गेली. ओंकार निराश झाला, तेवढ्यात दहिसरच्या पुढच्या स्टेशनवर गर्दीतून तीच मुलगी चढली.

आज तिच्या चेहऱ्यावर थोडं हसू होतं. ती बॅगेतून पाणी काढत होती. गर्दीमुळे बॅग नीट उघडता येत नव्हती. ओंकारने धाडस करून विचारलं “मी मदत करू का?”

ती क्षणभर थांबली. मग हलक्या आवाजात म्हणाली, “नको, मी करू शकते.”

ओंकार थोडा गडबडला, पण तिच्या चेहऱ्यावर हसू पाहून त्यालाही बरं वाटलं. मग त्यानेच पुढाकार घेत म्हटलं “माझं नाव ओंकार.”

“मी ईरा,” ती म्हणाली.... त्यांच्या संभाषणाचा तो पहिला क्षण होता.

भाग 5 : लोकलमधली मैत्री

AI Generated Photo

त्या छोट्या ओळखीच्या क्षणानंतर ओंकारच्या आणि ईराच्या नजरा वारंवार जुळू लागल्या.

लोकलची गर्दी, ढकलाढकली, सगळं जसंच्या तसं होतं, पण त्या गोंधळात आता त्यांचं एक वेगळं जग उभं राहिलं होतं.

एका दिवशी ओंकारने विचारलं “तुम्ही रोज याच वेळेला प्रवास करता का?”

ईरा हसत म्हणाली “हो. ऑफिस बोरीवलीला आहे. मी एका संस्थेत काम करते. आकाशपाय. दिव्यांगांसाठी रॅम्प्स, सोयी, खेळांसाठी प्रशिक्षण असं आम्ही करतो.”

ओंकार थोडा थक्कच झाला. “खरंच? कमाल आहे. मी ग्राफिक्स डिझाईन करतो. पोस्टर्स, जाहिराती… कधी स्वतःसाठी स्केचही काढतो.”

“मग छान आहे,” ईरा म्हणाली. “आमच्या संस्थेला पोस्टर्स बनवणारा कोणी पाहिजे आहे. तु मदत करशील?”

त्यांचं बोलणं पुढे सरकत गेलं. सुरुवातीला फक्त लोकलपुरतं, नंतर प्लॅटफॉर्मवर थांबूनही. कधी एकत्र चहा, कधी वडापाव.

गर्दीत एकमेकांच्या बॅगा सांभाळणं, स्टेशन बदललं की एकमेकाला कळवणं हळूहळू सगळं सहज घडू लागलं.

ओंकारला आता हा प्रवास कंटाळवाणा वाटत नव्हता. उलट रोजच्या लोकलची तो आतुरतेने वाट पाहू लागला.

भाग 6 : ईराची दुनिया

AI Generated Photo

एका संध्याकाळी ट्रेनमध्ये बसून ओंकारने विचारलं “ईरा, तु अशी धावतेयस का? म्हणजे पायाच्या… परिस्थितीतही?”

ईराने हलकंसं स्मित केलं. “मी ब्लेड-रनर आहे. प्रोस्थेटिक पायामुळे मी धावते. पाच वर्षांपूर्वी मला आजार झाला होता, पाय गमवावा लागला. पण मग ठरवलं, आयुष्याने जे दिलंय ते स्वीकारायचं रडत बसायचं नाही. त्याला ताकद बनवायचं. धावणं माझं ध्येय झालं.”

ओंकार काही क्षण शब्द शोधत बसला. पण त्याला ईराचा आत्मविश्वास पाहून खूप भारी वाटले, मग तो म्हणाला, “तुझं धाडस… खरंच अप्रतिम आहे.”

ईराने त्याच्याकडे पाहिलं. “धाडस? नाही… हे जगायची माझी पद्धत आहे. प्रत्येकाला आपापल्या लढाया लढाव्याच लागतात, ओंकार. माझी लढाई फक्त दिसते थोडी वेगळी.”

ओंकार तिच्या डोळ्यांत हरवून गेला. त्या डोळ्यांमध्ये अपूर्णतेचा लवलेश नव्हता, होता तो फक्त आत्मविश्वास.

भाग 7 : ओंकारची घरची कसोटी

लोकलमधले ओंकारचे दिवस आता बदलले होते. ईरासोबतची ओळख आता मैत्रीत आणि मैत्री हळूहळू आणखी काहीतरी खास नात्यात बदलत होती.

AI Generated Photo

पण घरी परतल्यावर मात्र सगळं पूर्वीसारखंच. आई रोजप्रमाणे लग्नाचा विषय काढत असे, “ओंकार, बघ रे, ज्योतीताईंच्या भाचीचा फोटो पाठवलाय. इंजिनीअर आहे. चांगली मुलगी दिसतेय.”

ओंकार फोटो न बघताच मोबाइल बाजूला ठेवत असे. मनात मात्र ईराचाच चेहरा.

एका रात्री आईने थेट विचारलं “तुझ्या मनात एखादी मुलगी आहे का? की आम्हीच बघू?”

ओंकार थोडा थबकला. त्याच्या ओठांवर उत्तर होतं, पण शब्द बाहेर पडले नाहीत. त्याला भीती होती “आईला जर कळलं की ईराचा एक पाय कृत्रिम आहे, तर ती मान्य करेल का? की मला चुकीचं ठरवेल?”

त्या रात्री तो खूप अस्वस्थ झाला. आरशात स्वतःकडे पाहताना त्याला जाणवलं, “ईराला मी मनापासून स्वीकारतो, पण खरं सांगायचं धाडस माझ्यात आहे का?”

भाग 8 : गर्दीतली परीक्षा

काही दिवसांनी पावसाच्या सरींनी लोकल उशिरा धावू लागल्या. एके दिवशी दहिसरच्या पुलावर अचानक प्रचंड गर्दी झाली. लोक ढकलाढकली करत खाली उतरू लागले.

AI Generated Photo

अचानक एक वयोवृद्ध माणूस घसरला आणि धापा टाकू लागला. आजूबाजूचे लोक फक्त ढकलत होते. ईरा एकदम पुढे झाली.

“जागा करा! बाजूला व्हा!” ती जोरात ओरडली.

तिने त्या माणसाला आधार दिला. तिचा प्रोस्थेटिक पाय पाण्यात थोडा घसरत होता, पण ती निर्धाराने उभी राहिली. ओंकारही धावत गेला, पाण्याची बाटली आणली. दोघांनी मिळून त्या गृहस्थाला खाली उतरवलं.

भाग 9 : ‘लव्ह इन लोकल’चा खरा शेवट

ईरा हसली आणि म्हणाली, “देवाला यायला उशीर होतो कधी कधी, म्हणून आपणच एकमेकांसाठी देव व्हावं लागतं.”

AI Generated Photo

त्या क्षणी ओंकारच्या मनातली भीती संपली. आता तर ईराने त्याच्या हृदयात पक्की जागा निर्माण केली “अरे मी हिला स्वीकारू का शकत नाही? ती तर स्वतःच इतरांसाठी आधार आहे. अपूर्ण मी आहे, ती नाही" असा प्रश्न तो स्वत:लाच विचारतो.

त्या रात्री ट्रेनमधून उतरल्यावर ओंकारने ईराला थांबवलं. “ईरा… आज तू घरी येशील का? आई-वडिलांना भेटायला.”

ईरा थोडी स्तब्ध झाली. “ओंकार, मी कोणाचं प्रमाणपत्र नाही. मला कुणासमोर स्वतःला सिद्ध करायचं नाही.” ईरानं असं उत्तर दिलं जसं तिला पुढे काय होणार आहे हे सगळंच माहित होतं. पण तिच्या मनात देखील काही गोष्टी सलत होत्या हे तेव्हा ओंकारच्या लक्षात आलं.

ओंकारने शांतपणे तिच्या डोळ्यात पाहिलं. “हो, मला ठाऊक आहे. आज ‘प्रूफ’ द्यायचा असेल तर तो मी देणार आहे, आई-बाबांना, समाजाला… आणि स्वतःलाही.”

ईरा क्षणभर शांत राहिली, मग हलकं हसली “ठीक आहे. पण अट अशी आहे की, मी तुझ्या बरोबरीने असेन, दयेने नाही.”

त्या संध्याकाळी ईरा ओंकारच्या घरी आली. आईने सुरुवातीला औपचारिक नमस्कार केला. थोड्याच वेळात चहा ठेवला. वातावरणात शांतता होती.

AI Generated Photo

आईने अखेर प्रश्न विचारला “बाळा, तुझ्या पायाला… म्हणजे तुला काही अडचण तर होत नाही ना?”

ईरा हसली. “आजी नेहमी म्हणायची शरीराचं नशीब असतं, पण मनाचं ध्येय असतं. माझ्या पायाचं नशीब वेगळं निघालं, पण मी त्याला ध्येयात बदललं आणि तुमच्या मुलाने मला तिथे साथीदार म्हणून पाहिलं. त्यामुळे तो मी आता कमी होऊ देणार नाही उलट अजून उंच होईल.”

आई काही क्षण गप्प राहिली. मग कप ओंकारकडे सरकवत म्हणाली “कटिंग चहा घे."

ओंकार आता गोंधळला होता. ईरानेच सगळं सांगितल्यामुळे सुरुवात कुठून करायची आता त्याला सुचत नव्हतं. तो विचारातच होता तोच आई म्हणाली, "आणि हो… या नात्याचा निर्णय जर तू ठामपणे घेतला आहेस, तर मी तुझ्या पाठीशी उभी आहे.”

वडीलही काही न बोलता हसले.

ओंकारला आता काय बोलावं सुचत नव्हतं. त्या क्षणी ओंकारच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळू आवाजात म्हटलं, “मी तिला स्वीकारत नाही… मी स्वतःला स्वीकारतो आणि तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे.”

आई म्हणाली, "हो ते आमच्या केव्हाच लक्षात आलं होतं, आम्ही दाखवलेल्या सगळ्या मुलींना तु नकार दिलास, दररोज न आवडलेली ट्रेन तुला अचानक आवडू लागली आणि त्या दिवशी तर तुम्हाला दोघांनी मी स्टेशनवर पाहिलं सुद्धा. तेव्हाच ठरवलं आपल्याला सुन मिळाली."

AI Generated Photo

"ईराच्या पायाचं आम्हाला थोडं वाईट वाटलं, पण नतंर आम्ही तिला स्वीकारलं आहे. तुम्ही दोघं एकमेकांना पसंत करता ना, आनंदी आहात ना, मग बस झालं... नातेवाईक आणि बाजू वाल्यांना कसं सांभाळायचं याचं टेन्शन तू नको घेऊ, तुझे बाबा आणि आई खमकी आहे." ओंकारचे बाबा पुढे म्हणाले आणि काही महिन्यातच ईरा आणि ओंकारचं लग्न झालं.

भाग 10 : लव्ह इन लोकल

काही महिन्यांनी ‘आकाशपाय’च्या कार्यक्रमात ओंकार आणि ईरा एकत्र उभे होते. पोस्टर्सवर ओंकारची डिझाईन्स, रनिंग ट्रॅकवर ईराची झेप.

AI Generated Photo

ओंकारने स्टेजवर सांगितलं “लोकलमध्ये रोज लाखो कथा जन्म घेतात. गर्दीत अनोळखी माणसं एकमेकांच्या आयुष्याचा भाग होतात. आमचीही कथा तिथूनच सुरू झाली.”

ईराने वाक्य पुढे नेलं “गर्दी शिकवते, जागा द्या. प्रेम शिकवतं मनात जागा ठेवा.”

शेवटी ओंकारने आपलं स्केचबुक उघडलं. पहिल्या पानावर ईराचा चेहरा, दुसऱ्या पानावर तिचा प्रोस्थेटिक पाय, तिसऱ्या पानावर आई चहा ओतताना, आणि शेवटच्या पानावर लोकलच्या दारात उभ्या दोन सावल्या.

तो म्हणाला “ही आमची कथा आहे. ‘लव्ह इन लोकल’. रोजच्या गर्दीतून जन्मलेलं प्रेम, जे रोज नव्यानं पुढच्या स्टेशनकडे धावत राहतं.”

प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या. ईराने ओंकारकडे पाहिलं आणि दोघे हसले.

ट्रेनसारखंच त्यांचं प्रेम आता कायम धावणार होतं. कधी गर्दीत, कधी पावसात, पण नेहमी पुढच्या स्टेशनकडे.....

या कथेतील सर्व पात्रे, घटना, प्रसंग आणि ठिकाणे पूर्णतः काल्पनिक आहेत. त्यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी, जिवंत किंवा मृत, किंवा कोणत्याही सत्य घटनेशी कोणताही संबंध नाही. जर यात काही साधर्म्य किंवा योगायोग आढळला, तर तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनासाठी लिहिली आहे आणि कोणत्याही विशिष्ट व्यक्ती, समुदाय, धर्म किंवा ठिकाणाला दुखावण्याचा तिचा कोणताही हेतू नाही.

मराठी बातम्या/मराठी कथा/
Love In Local : प्रेम शरीराशी होतं का मनाशी....? ईराला पाहून विचारात गुंतलेल्या ओंकारला अखेर उत्तर मिळालं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल