सोलापूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिना नदीला अचानकपणे पूर आल्याने उत्तर सोलापूर तालुक्यातील तिऱ्हे गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी आपला जीव वाचवत कष्टाने उभा केलेला घर संसार सोडून स्थलांतर व्हावं लागलं. पाणी ओसरल्यानंतर तिऱ्हे गावात राहणारे ग्रामस्थ आपलं घर आहे का नाही हे पाहण्यासाठी गावात येत आहेत. पाणी ओसरल्यानंतर हेळवे परिवार घरी परत आल्यानंतर विदारक परिस्थिती पाहून अश्रू अनावर झाले.
advertisement
पुढच्या महिन्यात 30 ऑक्टोबरला मुलीचं लग्न, लग्नासाठी मुलीचा बस्ता आणून ठेवला होता. घरामध्ये आनंदाचे वातावरण होतं. पण तीन दिवसांपूर्वी अचानकपणे सीना नदीला पूर आला. पूर आल्याने हेळवे परिवारासह गावातील ग्रामस्थांनी आपला जीव वाचवत घर सोडलं. परत येऊन पाहिल्यावर घरातील संसारोपयोगी साहित्य पाण्यात वाहून गेलं तर गेलं पण मुलीच्या लग्नाला आणलेला बस्ता देखील पाण्यात वाहून गेला. चाळीस वर्षांनंतर पहिल्यांदाच सीना नदीला महापूर आल्याचं कोमलच्या आईने सांगितलं.
लग्न जवळ आल्याने घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं. पाहुणे, जवळचे नातेवाईक यांच्या घरी येणं जाणं होतं. पण सीना नदीला आलेल्या महापुरामुळे तिऱ्हे गावामध्ये दुःखच दुःख पाहायला मिळत आहे. सीना नदीचं पाणी ओसरलं असून ग्रामस्थांच्या डोळ्यात मात्र पाणीच पाणी दिसत आहे.