सध्या देशभरात लसणाचे भाव गगनाला भिडले आहेत. केवळ खरेदीदारच नाही तर शेतकऱ्यालाही लसणाची चिंता आहे. लसणाच्या वाढत्या किमतीमुळे शेतातून लसणाची चोरी होऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांना आहे, त्यामुळे शेतकरी आता शेतातच सुरक्षा व्यवस्था करताना दिसत आहेत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून नुकतीच एक अनोखा घटना समोर आली आहे.
कोणीही लसूण पिकाची चोरी करू नये म्हणून याठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या लसणाच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत आणि काही मजूरही तैनात केले आहेत. छिंदवाडा येथील मोहखेड भागातील सांवरी येथे शेतकऱ्यांनी शेताच्या निगराणीसाठी त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे शेतात उगवलेली पिके आणि शेतात काम करणाऱ्या मजुरांवर लक्ष ठेवले जात आहे. लसूण पिकाच्या कापणीनंतर हे कॅमेरे शेतातून काढले जाणार आहेत.
advertisement
शेतकरी राहुल देशमुख यांनी सांगितले की, शेतात सीसीटीव्ही कॅमेरे तैनात केल्याने लसणाची चोरी वाचवता येऊ शकते. शेतात काम करणाऱ्या मजुरांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा स्थितीत चोरी किंवा कोणतीही दुर्घटना घडली तर ते बघता येते. यावेळी लसणाची लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. किमान एक एकरातून पाच लाखांचे उत्पन्न मिळते, अशी माहितीही त्यांनी दिली.
तर शेतकऱ्यांच्या शेतात कॅमेरे लावणारे गजानंद देशमुख यांनी सांगितले की, काही वस्तू महाग झाल्या तर चोरी आणि नुकसान होण्याची भीती असते. एका शेतकऱ्याला लसूण चोरी होण्याची भीती असल्याने त्यांच्या आदेशानुसार शेतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. याचा शेतकऱ्याला चांगला लाभ झाला असून शेतात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. तसेच घरी बसून मजूरांवर नजर ठेवली जाऊ शकते. हा फायदा पाहिल्यानंतर इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. इतर तीन ते चार शेतकऱ्यांनीही त्यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, असेही त्यांनी सांगितले.