सोलापूर : पारंपरिक शेतीसोबत फळबाग, फूलबाग फुलवून, पालेभाज्यांची लागवड करून शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न मिळवतात याची अनेक उदाहरणं आपण आजवर पाहिली असतील. शिवाय शेतीपूरक व्यवसायांमधूनही उत्तम उत्पन्न मिळतं. केवळ त्या व्यवसायाला मार्केटिंग, रिसर्चची जोड आणि कष्ट हवे असतात. मग गायीच्या दुधातूनही बक्कळ नफा मिळू शकतो.
अनेकजण जवळपास दररोज दूध विकत घेतात. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय नफ्याचा आहे, यात काहीच शंका नाही. हीच बाब लक्षात घेऊन सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात शेज बाभूळगाव इथं शेतकरी शशिकांत पुदे यांनी काजळी खिल्लार गायींचा गोठा उभारलाय. वडिलोपार्जित देशी गायींचा गोठा होता, त्यात त्यांनी शेती विकासासोबत काजळी खिल्लार गायींची संख्या वाढवली. दुधाळ गायी आणि वळू त्यांच्या गोठ्यात आहेत. बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यांनी दूधविक्रीसह तूपनिर्मितीवर भर दिलाय.
advertisement
हेही वाचा : शेतकऱ्यानं केला प्रयोग, घेतलं लाल मिरचीचं उत्पादन! आज एकरी नफा 3 लाखांचा
शशिकांत पुदे यांच्या गोठ्यात 1 गाय दररोज सरासरी 8 ते 10 लिटर दूध देते. सध्या गोठ्यात 9 गायी, 2 कालवडी आणि 3 वळू आहेत. त्यापैकी 6 खिल्लार गायी दुधाळ आणि 3 गाभण आहेत. पुदे दरवर्षी 4 कालवडी आणि 2 खोंड विकतात. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून या वर्षीच्या कालवडी आणि वळूंसाठी आगाऊ नोंदणी पूर्ण झालीये.
मार्केटमध्ये देशी गायींच्या दूध आणि तुपाला सर्वाधिक मागणी आहे. मात्र मागणीएवढा पुरवठा करणं शक्य होत नाही. त्यामुळे पुदे यांनी स्वतः दूध आणि तुपाला स्थानिक भागात मार्केट तयार केलं. सध्याच्या काळात दररोज 15 लिटर दूध जमा होतं. हे दूध मोहोळ शहरातील ग्राहकांना 80 रुपये प्रतिलिटर दरानं विकलं जातं. तसंच दरमहा 3 ते 5 किलो तूपनिर्मिती केली जाते. तुपाला प्रतिकिलो 3 हजार रुपयांचा भाव मिळतो.
हेही वाचा : आई-वडिलांचं छत्र हरपलं, भावंडांनी शेती करायचं ठरवलं, आज 5 गाड्यांचे मालक!
तसंच खिल्लार वळूंचा उपयोग रेतनासाठी होतो. परिसरातील शेतकरी खिल्लार गायी रेतनासाठी त्यांच्या गोठ्यात घेऊन येतात. एका गायीच्या रेतनासाठी 1100 रुपये दर आहे. महिन्याकाठी व्यवस्थापन खर्च वजा करून खिल्लार गोवंश संगोपनातून पुदे यांना 1 लाख ते दीड लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. त्यातून ते सुखाचं आयुष्य जगत आहेत.