जालना : सुकामेवा आपल्या आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर असतो. त्यातून आरोग्याला अनेक पोषक तत्त्व मिळतात. म्हणूनच सुकामेवा विक्रीतूनही उत्तम कमाई होते. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी हा फायद्याचा शेतीपूरक व्यवसाय आहे.
जालना जिल्ह्यातील कडवंची आणि गंगापूर ही गावं विशेषतः द्राक्ष्यांसाठी ओळखली जातात. इथं प्रत्येक शेतकऱ्याची किमान एकतरी द्राक्षाची बाग आहेच. परंतु द्राक्षविक्रीतून होणार नाही, तेवढी कमाई मनुके विक्रीतून होईल हे इथल्या शेतकऱ्यांना अचूक माहित होतं. त्यामुळे 8-10 कुटुंबीयांनी मनुके विकायचं ठरवलं. आज वर्षानुवर्षे ते हा व्यवसाय करतात, त्यातून त्यांची कमाई नेमकी किती होते पाहूया.
advertisement
जालना नावा महामार्गावर ही कुटुंब मनुके विक्रीचा व्यवसाय करतात. यापैकी अनेकजणांची स्वतःची द्राक्षांची बाग आहे. ते आपल्या बागेतील द्राक्ष्यांपासूनच मनुके तयार करून विकतात, तर काही मनुके हे बाजारातून खरेदी केलेले असतात. यातून त्यांची दिवसाला 4 ते 5 हजार रुपयांची उलाढाल निश्चितच होते आणि निव्वळ नफा होतो 1000 ते 1200 रुपयांचा. म्हणजेच महिन्याला त्यांना या व्यवसायातून केवळ नफा मिळतो 30 हजारांचा.
महामार्गाच्या कडेलाच स्टॉल लावलेले असल्यामुळे महामार्गावरून जाणारी वाहनं इथं हमखास थांबतात. चालक पाव किलोपासून 4 ते 5 किलो मनुक्यांची खरेदी करतात. यातून या कुटुंबांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला असून त्यावर त्यांचा संसार उत्तम सुरू आहे.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक इत्यादी ठिकाणहून आलेले आणि इथं जाणारे प्रवासी खास याठिकाणी मनुके खरेदीसाठी थांबतात. बाराही महिने महामार्गाच्या कडेला 10 ते 12 मनुक्यांची दुकाने लागलेली असतात, असं विक्रेते दशरथ जारे यांनी सांगितलं.