छत्रपती संभाजीनगर : आता अनेक शेतकरी बांधव केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायांमधून उत्तम उत्पन्न मिळवू लागले आहेत. तरुण प्रगतशील शेतकरीही शेतात विविध प्रयोग करून चांगला नफा मिळवतात. अगदी नर्सरी व्यवसायातूनही लाखोंचं उत्पन्न मिळवता येतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जहीर पठाण.
जहीर पठाण हे फुलंब्री तालुक्याच्या आळंद गावचे रहिवासी. त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलंय. त्यानंतर वडिलोपार्जित शेतात त्यांना पेरूची लागवड करायची होती. मात्र त्यासाठी बाहेरून रोप आणावे लागायचे जे त्रासदायक होतं. म्हणून स्वत:च नर्सरी सुरू करायचं ठरवलं, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सहज रोप उपलब्ध होतील. मग त्यांनी आपल्या शेतातच नर्सरीचा व्यवसाय सुरू केला. 2018 पासून ते या क्षेत्रात काम करतात.
advertisement
हेही वाचा : सावकाराच्या तावडीतून जमीन सोडवण्यासाठी काय कराल? गप्प बसू नका, तक्रार करा!
जहीर पठाण हे नर्सरीत आंबा, पेरू, जांभूळ, सिताफळ, डाळिंब, इत्यादींचे कलम तयार करून ते शेतकऱ्यांना विकतात. दरवर्षी साधारण 80 हजार कलम ते तयार करतात. त्यातून वर्षाकाठी त्यांना जवळपास 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळतं. तसंच त्यांनी या नर्सरीत अनेकजणांना रोजगारही मिळवून दिला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या बागवान पुरस्कारानं त्यांच्या नर्सरीला गौरविण्यात आलंय.
जहीर पठाण यांनी सांगितलं की, 'सर्व शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीपेक्षा शेतीविषयक वेगळा काहीतरी व्यवसाय करावा. जसा मी नर्सरी व्यवसाय केला आहे. यातून मला महिन्याकाठी आणि वर्षाकाठी चांगलं उत्पन्न मिळतं. मी सर्व शेतकऱ्यांना हेच आवाहन करतो की, आपणसुद्धा असाच व्यवसाय करून त्याच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न मिळवावं.'