सातारा : आता शेतकरी बांधव पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन चांगलं उत्पन्न मिळवू लागले आहेत. अनेक शेतकरी भाजीपाला, फळबाग आणि फुलबागेतून लाखोंचं उत्पन्न कमवतात. याचंच उत्तम उदाहरण आहे साताऱ्यात. जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यात असलेल्या साप गावातील जाधव बंधूंनी पडक्या माळरानावर प्रचंड कष्ट घेऊन जणू सोनं उगवलं. आज या शेतीतून ते लाखो रुपयांचं उत्पादन घेतात. कल्याण आणि विजय असं या 2 भावंडांचं नाव. आई-वडिलांचं छत्र हरपल्यानंतर त्यांचा सांभाळ बहिणीनं केला आणि त्यांनी माळरानावर स्वकष्टानं नंदनवन फुलवलं. आज त्यांच्या या मेहनतीचं आजूबाजूच्या गावांमध्येही कौतुक होतं.
advertisement
2006 साली आई-वडिलांचं निधन झालं. मग जाधव बंधूंनी घरची जबाबदारी स्वीकारून बँकेतून कर्ज घेतलं आणि माळरान पोखरलं. आता त्यांनी शेती करायचं ठरवलं. मात्र पाणी कुठून आणायचं हा मोठा प्रश्न होता. मग जिद्दीनं त्यांनी 3 किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन काढून आपल्या माळरानावर पाणी आणलं आणि शेतीला सुरूवात झाली.
हेही वाचा : शेतकऱ्यानं करून दाखवलं; खडकाळ जमिनीवर लालचुटूक फळ फुलवलं, उत्पन्न भरपूर
अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र त्यांनी हार मानली नाही. शेतात वेगवेगळे प्रयोग केले आणि ऊसाचं उत्पादन घेतलं. पाठोपाठ आल्याचंही उत्पादन घेतलं. त्यानंतर भाजीपाला शेतीला सुरूवात केली. हळूहळू त्यांना चांगलं उत्पन्न मिळत गेलं. ज्या जमिनीवर जनावरांना चरण्यासाठी दूरदूरपर्यंत झुडूपं नव्हती, त्या जमिनीवर त्यांनी नंदनवन फुलवण्याची किमया केली. नापीक जमिनीला सुपीक करण्यासाठी अर्धा किलोमीटर लांब जाऊन पाणी आणलं. या अंतरात सावली मिळवायला एखादं झाडही नव्हतं. अशा या रानावर आज त्यांनी 40 आंब्याची, 20 नारळाची, चिकू, सफरचंद, अंजीर, सिताफळ, इत्यादी अनेक झाडांची लागवड करून फळबाग फुलवली आहे.
त्यांनी फळबाग, फूलबाग, पालेभाज्या, ऊस, सोयाबीन, आलं, टोमॅटो, इत्यादी विविध पिकांची लागवड केली. या शेतीच्या माध्यमातूनच दोन्ही भावंडांची लग्न झाली आणि दोघांचे संसारही सुरू झाले. या शेतीसाठी त्यांना मित्रांची आणि बहिणीची मोलाची साथ मिळाली. महत्त्वाचं म्हणजे एकेकाळी या 2 भावंडांकडे सायकल नव्हती, आज ते स्कॉर्पिओ, बुलेटसह 4-5 गाड्यांचे मालक आहेत. खडकाळ माळरानावर केलेल्या शेतात आज त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे 25 ते 30 लाख रुपये. आज शेतीच्या माध्यमातून ते सुखी आयुष्य जगत आहेत. विजय संभाजी जाधव यांनी याबाबत माहिती दिली.