शेतकऱ्यानं करून दाखवलं; खडकाळ जमिनीवर लालचुटूक फळ फुलवलं, उत्पन्न भरपूर
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Abhijeet Rameshwar Pawar
Last Updated:
खडकाळ जमीन आणि पाण्याची कमतरता असल्यानं पारंपरिक शेतीतून चांगलं उत्पादन मिळत नव्हतं. अशात त्यांनी ही शेती करून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्शच निर्माण केलाय.
अभिजीत पवार, प्रतिनिधी
बीड : आहारात फळांचा समावेश करावा, असा सल्ला डॉक्टर अगदी लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वांना देतात. बाजारात हंगामी फळांना विशेष मागणी असते. त्यामुळे या फळांची लागवड करून त्यातून निश्चितच चांगलं उत्पन्न मिळवता येऊ शकतं. हेच गणित लक्षात घेऊन अनेक शेतकरी बांधव फलोत्पादनातून उत्तम कमाई करतात.
बीड तालुक्याच्या नेकनुर इथं शेतकरी अजय रघुनाथ सातपुते आणि जयदेव रघुनाथ सातपुते यांनी 'ड्रॅगन फ्रूट' शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना एका शेतात ड्रॅगन फ्रुट दिसलं. त्यांनी तिथं खास थांबून त्या शेतीची पाहणी केली, त्याबाबत व्यवस्थित माहिती जाणून घेतली आणि मग आपणसुद्धा या पिकाचं उत्पादन घ्यायचं असं ठरवलं. सुरूवातीला त्यांनी एका एकरात ड्रॅगन फ्रुटची लागवड केली.
advertisement
खडकाळ जमीन आणि पाण्याची कमतरता असल्यानं पारंपरिक शेतीतून चांगलं उत्पादन मिळत नव्हतं. अशात त्यांनी ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्शच निर्माण केलाय. सुरूवातीला एका एकरात असलेली ही शेती त्यांनी हळूहळू 3 ते 4 एकरावर नेली. आज एकरातून त्यांना वर्षाकाठी 4 ते 5 लाख रुपयांचं उत्पन्न सहज मिळतं. हे सातपुते कुटुंबाचं मोठं यश म्हणावं लागेल.
advertisement
ड्रॅगन फ्रूट आरोग्यदायी!
ड्रॅगन फ्रुटमुळे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो. ड्रॅगन फ्रुटमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर्स आणि क जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. हे फळ आरोग्यदायी असल्यानं त्याला बाजारात मोठी मागणी मिळते.
ड्रॅगन फ्रुटची शेती म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पन्न. शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देऊन उत्तम उत्पन्न मिळवावं असं आवाहन वारंवार केलं जातं. त्यामुळे फळबाग पिकवण्याच्या विचारात असाल तर ड्रॅगन फ्रुट हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
July 29, 2024 12:49 PM IST