बेंगळुरू: जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी असलेल्या ब्लॅकरॉकच्या भारतीय युनिट ब्लॅकरॉक सर्विसेस इंडियाने बेंगळुरूच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये नवीन ऑफिस भाड्याने घेतले आहे. हे ऑफिस एमजी रोडवरील इंडिक्यूब सिम्फनीमध्ये आहे. आणि ते सुमारे 1,43,000 चौरस फूट परिसरात पसरलेले आहे. हा 10 वर्षांचा करार असून त्याचे एकूण भाडे 410 कोटी रुपये आहे. अलीकडच्या काळात देशातील सर्वात मोठ्या एंटरप्राइज फ्लेक्सिबल स्पेस व्यवहारांपैकी हा एक आहे.
advertisement
प्रोपस्टॅकने शेअर केलेल्या भाडेकराराच्या कागदपत्रांनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला हा करार नोंदणीकृत झाला असून तो 1 ऑक्टोबर 2025 पासून सुरू होईल. ब्लॅकरॉक 2.72 कोटी रुपये मासिक भाडे देईल, जे 190 रुपये प्रति चौरस फूट असेल. यासाठी 21.75 कोटी रुपयांची सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) देखील जमा केली जाईल. हा करार टॉवरच्या G+5 मजल्यांसाठी आहे आणि यामध्ये दरवर्षी 5% भाडेवाढ होईल.
मोठ्या प्रकल्पाचा भाग
एका सूत्राने सांगितले की, हा व्यवहार या गोष्टीची पुष्टी करतो की बेंगळुरू सीबीडी (CBD) अजूनही ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी एक पसंतीचे ठिकाण आहे. इंडिक्यूबने या करारावर कोणतीही टिप्पणी करण्यास नकार दिला. ही प्रॉपर्टी इंडिक्यूबच्या एका मोठ्या प्रकल्पाचा भाग आहे. इंडिक्यूबने बेंगळुरू सीबीडीमध्ये तीन टॉवर्समध्ये 3,20,000 चौरस फूट जागा खरेदी केली आहे. हा 15 वर्षांचा प्रकल्प असून, यात नूतनीकरण (renovation) आणि अपग्रेडेशन केले जाईल. याला इंडिक्यूब सिम्फनी असे नाव दिले जाईल. याचे उद्दिष्ट एंटरप्राइज भाडेकरूंना प्रीमियम मॅनेज्ड वर्कस्पेस उपलब्ध करून देणे आहे.
मार्चपर्यंत इंडिक्यूब 15 शहरांमध्ये 115 केंद्रे चालवत होता. ते 8.4 दशलक्ष चौरस फूट जागेचे व्यवस्थापन करत होते. ज्यामध्ये 186,719 सीट्स होत्या. बेंगळुरूत 65 केंद्रे आणि 5.43 दशलक्ष चौरस फूट जागा होती. यामुळे बेंगळूरू हे इंडिक्यूबचे सर्वात मोठे बाजार बनले आहे. भारताच्या ऑफिस मार्केटमध्ये फ्लेक्स स्पेस एक मुख्य प्रवाहातली श्रेणी म्हणून उदयास आली आहे. कोलियर्सच्या मते- फ्लेक्स लीजिंगमध्ये वर्ष-दर-वर्ष 48% वाढ झाली आहे. 2025 च्या पहिल्या सहामाहीत ते 6.5 दशलक्ष चौरस फुटांपर्यंत पोहोचले, जे एकूण लीजिंगच्या 19% आहे.
लॅरी फिंक कोण आहेत?
याआधी ब्लॅकरॉकने मुंबईतील आलिशान वरळी भागात एका प्रीमियम कमर्शियल टॉवरमध्ये 42,700 चौरस फुटांपेक्षा जास्त ऑफिसची जागा पाच वर्षांसाठी भाड्याने घेतली होती. ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांना जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जाते. याचे कारण म्हणजे ब्लॅकरॉक जगात 10 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त मालमत्ता (ॲसेट) व्यवस्थापित करते. ब्लॅकरॉकला भारतातील वेगाने वाढणाऱ्या आर्थिक बाजारपेठांमध्ये आपली उपस्थिती नोंदवायची आहे.