सौदी अरेबियाच्या सरकारी खाण कंपनी माआदेन (Maaden) ने देशात मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा सापडल्याची माहिती दिली आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या ड्रिलिंगदरम्यान सौदी अरेबियात सुमारे 78 लाख औंस (अंदाजे 221 टन) नवे सोने सापडल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या नव्या शोधामुळे सौदी अरेबियाच्या एकूण सोन्याच्या संसाधनांमध्ये लक्षणीय भर पडली आहे.
advertisement
मिळालेलं हे सोने देशातील चार वेगवेगळ्या भागांमध्ये आढळून आलं आहे. यामध्ये मन्सूराह मस्सारा (Mansourah Massarah), उरुक 20/21 (Uruq 20/21), उम्म अस सलाम (Umm As Salam) आणि वादी अल जॉ (Wadi Al Jaw) या भागांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात सोन्याचे साठे आढळले असून, त्यापैकी वादी अल जॉ परिसरात सर्वाधिक सोने असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कंपनीच्या माहितीनुसार, ही शोधमोहीम काही ठिकाणी आधीपासून सुरू असलेल्या खाणींमध्ये करण्यात आली असून, काही ठिकाणी नव्या भागांमध्ये करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीतून ही सोन्याची संपत्ती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात या भागांमध्ये खाणकाम अधिक वेगाने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुढे काही तरी मोठं घडणार, Gold-Silverची ही तेजी नाही, इशारा आहे; 24 तासात...
मौल्यवान खनिजांनी समृद्ध प्रदेश
तज्ज्ञांच्या मते, अरेबियन शिल्ड (Arabian Shield) म्हणून ओळखला जाणारा प्रदेश, जो सौदी अरेबियाच्या अनेक भागांमध्ये पसरलेला आहे. हा सोने आणि इतर मौल्यवान खनिजांनी समृद्ध आहे. नुकत्याच झालेल्या या शोधांमुळे या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती असल्याची आधीची धारणा आणखी मजबूत झाली आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या महद गोल्ड माइनसारख्या जुन्या खाण क्षेत्रांच्या आसपास करण्यात आलेल्या तपासणीतही नवे खनिज क्षेत्र सापडण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे आगामी काळात या संपूर्ण भागात खाणकामाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
व्हिजन 2030 अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
हा सोन्याचा मोठा शोध सौदी अरेबियाच्या ‘व्हिजन 2030’ या दीर्घकालीन आर्थिक धोरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तेलावर असलेली अवलंबित्व कमी करून अर्थव्यवस्थेत विविधता आणण्यासाठी खाण उद्योगाला सौदी सरकारकडून विशेष प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर हा शोध खाण क्षेत्राला बळ देणारा मोठा टप्पा ठरू शकतो.
गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी
उद्योगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एक मजबूत आणि शाश्वत खाण उद्योग उभारण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर, आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अशा मोठ्या खनिज शोधांमुळे केवळ देशाचे सोन्याचे साठे वाढत नाहीत, तर परदेशी गुंतवणूकदार आणि जागतिक खाण कंपन्यांचेही लक्ष सौदी अरेबियाकडे वेधले जाते.
या नव्या खाण साइट्सच्या आसपास असलेल्या गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये रोजगारनिर्मिती, रस्ते व दळणवळण सुविधा सुधारणा आणि एकूणच विकासाला चालना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय सोन्याबरोबरच तांबे, निकेल आणि इतर मौल्यवान खनिजे देखील भविष्यात सौदी अरेबियाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
