दिनेशचं बालपण अत्यंत साध्या परिस्थितीत गेलं. त्याचे आई-वडील शेतमजुरी करून पोट भरीत. घर चालवणं कठीण झालं तेव्हा ते दोघंही बेंगळुरूला नोकरीच्या शोधात गेले. त्या वेळी दिनेश फक्त सात वर्षांचा होता. आईने दिवसाचं घरकाम आणि रात्री कपड्यांच्या फॅक्टरीत काम करून मुलांचं भविष्य घडवायचं ठरवलं. तिच्या डोळ्यांत मात्र एकच स्वप्न होतं, “माझ्या मुलांना मी चांगलं शिक्षण देणार.”
advertisement
दहावी नंतर दिनेशने पारंपरिक मार्ग सोडून सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कारण तेथे मोफत वसतिगृहाची सुविधा होती. आर्थिक अडचणी असूनही त्याने अभ्यासात कसलीही तडजोड केली नाही. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तो वर्गातील टॉपर विद्यार्थ्यांमध्ये गणला गेला. याच क्षणापासून त्याच्या आयुष्याचा ‘टर्निंग पॉइंट’ सुरू झाला.
पहिली नोकरी फक्त 5 हजार रुपये पगाराची
पॉलिटेक्निकनंतर त्याने इंजिनिअरिंगचं स्वप्न पूर्ण केलं. त्याचा भाऊ पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये कामाला लागला आणि त्याने दिनेशला पुढे शिकण्यासाठी आधार दिला. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर बेंगळुरूमधील एका छोट्या कंपनीत जूनियर वेब डेव्हलपर म्हणून त्याला पहिली नोकरी मिळाली. मासिक पगार केवळ 5 हजार रुपये. पण त्याचं कोडिंगवरील प्रेम आणि शिकण्याची आवड प्रचंड होती.
दिवस-रात्र मेहनत करत त्याने स्वतःला घडवलं, नवीन तंत्रज्ञान शिकलं आणि आपल्या कामाने सर्वांना प्रभावित केलं. काही वर्षांतच त्याचं प्रमोशन होत गेलं आणि आज तो त्याच कंपनीत इंजिनिअरिंग मॅनेजर पदावर कार्यरत आहे. त्याचं वार्षिक पॅकेज आहे तब्बल 48 लाख रुपये.
दिनेशची गोष्ट ही फक्त एका मुलाची नाही, तर त्या आईच्या घामाची आणि त्यागाची कहाणी आहे, जिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी सर्व काही दिलं. गरीबी, संघर्ष, आणि परिस्थिती हे फक्त टप्पे आहेत. जर मनात जिद्द असेल, तर यश आपोआप चालून येतं.