बर्न: नेस्ले कंपनीने 16,000 कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने पदभार स्वीकारलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) फिलीप नावरातिल यांनी कंपनीत जलद सुधारणा घडवून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. स्वित्झर्लंडस्थित या खाद्यपदार्थ उत्पादक कंपनीने गुरुवारी दिलेल्या निवेदनात ही माहिती दिली.
advertisement
ही कर्मचारी कपात कंपनीच्या एकूण मनुष्यबळाच्या सुमारे 6 टक्के इतकी असून ती पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जाईल. नेस्ले जी नेस्प्रेसो कॉफी कॅप्सूल्स आणि किटकॅट चॉकलेट बार्ससारखी उत्पादने तयार करते तिने आपल्या खर्च बचतीचे लक्ष्य 2.5 अब्ज स्विस फ्रँकवरून वाढवून 3 अब्ज स्विस फ्रँक (सुमारे 3.7 अब्ज डॉलर) इतके केले आहे. ही बचत 2027 च्या अखेरपर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे.
जग बदलत आहे आणि नेस्लेलाही अधिक वेगाने बदलावे लागेल, असे नावरातिल यांनी गुरुवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यामध्ये कठीण पण आवश्यक निर्णयांचा समावेश असेल, ज्यात कर्मचाऱ्यांची कपात करणेही आलं आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नेस्लेने गेल्या महिन्यात नावरातिल यांची CEO म्हणून नियुक्ती केली होती. त्यांचे पूर्वसूरी लॉरेंट फ्रेइक्स यांना कंपनीने त्यांच्या एका महिला कर्मचाऱ्याशी असलेल्या वैयक्तिक नातेसंबंध लपवल्याच्या आरोपावरून केवळ एका वर्षातच पदावरून दूर केले होते. या घडामोडीनंतर कंपनीचे चेअरमन पॉल बुल्के यांनी नियोजित वेळेपेक्षा आधीच पदाचा राजीनामा दिला आणि त्यांच्या जागी इंडिटेक्स SA चे माजी CEO पाब्लो इस्ला यांची नियुक्ती करण्यात आली.
कर्मचारी कपातीच्या घोषणेसोबतच कंपनीने जाहीर केले की, तिसऱ्या तिमाहीतील विक्रीत 4.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही वाढ विश्लेषकांच्या अपेक्षेपेक्षा जास्त असून ती प्रामुख्याने वाढत्या किंमतींमुळे आणि वास्तविक अंतर्गत वाढीच्या सुधारित कामगिरीमुळे साध्य झाली आहे.
अजूनही स्थिती नाजूक असली तरीही, या निकालांमुळे गुंतवणूकदारांचा काही प्रमाणात नेस्लेवरील विश्वास परत येईल, असे वॉन्टोबेलचे विश्लेषक जीन-फिलिप बर्टशी यांनी म्हटले आहे. ज्युलियस बेअरच्या प्रीमार्केट ट्रेडिंगमध्ये नेस्लेचे शेअर्स 3.4 टक्क्यांनी वाढलेले दिसत आहेत. यावर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये 1.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. जी स्विस मार्केट इंडेक्समधील 8 टक्क्यांच्या वाढीपेक्षा कमी आहे.
नेस्लेच्या व्यवस्थापनातील या बदलामुळे कंपनीच्या पारंपरिक स्थिर संस्कृतीत हलचल निर्माण झाली असून नव्या नेतृत्वावर विक्री वाढवणे आणि कारभारातील पारदर्शकता सुधारण्याची जबाबदारी आली आहे.
‘महत्त्वाकांक्षेला स्वागत’
20 वर्षांहून अधिक काळ नेस्लेमध्ये कार्यरत असलेले आणि अलीकडेपर्यंत नेस्प्रेसो विभागाचे प्रमुख राहिलेले नावरातिल यांनी सांगितले की- ते पूर्वीच्या CEO फ्रेइक्स यांची धोरणे पुढे चालू ठेवणार आहेत. ज्यात जाहिरात खर्च वाढवणे, कमी पण प्रभावी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणे आणि तोट्यातील व्यवसाय बंद करणे यांचा समावेश आहे. कंपनीचे प्रमुख उद्दिष्ट आता वास्तविक अंतर्गत वाढ अधिक वाढवणे आहे आणि कंपनी आपल्या संपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओचे पुनर्मूल्यांकन करत आहे.
नावरातिल यांचा उद्देश मार्केट शेअर गमावण्याची संस्कृती संपवून, जिंकणाऱ्यांना प्रोत्साहन देणारी आणि अधिक आक्रमक संस्कृती विकसित करणे आहे. हे स्वागतार्ह आहे, असे RBC कॅपिटल मार्केट्सचे विश्लेषक जेम्स एडवर्ड्स जोन्स यांनी नमूद केले. वास्तविक अंतर्गत वाढीतील सुधारणा गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण अलीकडे याच बाबतीत सर्वाधिक चिंता व्यक्त केली जात होती.
माजी CEO फ्रेइक्स यांनी सुरू केलेल्या पुनर्रचनेत कंपनीच्या तोट्यातील व्हिटॅमिन ब्रँड्सची संभाव्य विक्री आणि बॉटल्ड वॉटर व्यवसायासाठी भागीदार शोधण्याचे प्रयत्न यांचा समावेश होता. त्यांनी या युनिटला स्वतंत्र व्यवसाय म्हणून वेगळे केले होते.
नावरातिल यांनी स्पष्ट केले की, जर काही नोकऱ्या या व्यवसायांच्या विक्री प्रक्रियेदरम्यान कमी झाल्या तर त्या 16,000 पदांच्या कपातीत गणल्या जाणार नाहीत.