वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने त्यांच्या गोल्ड आउटलुक २०२६ या रिपोर्टमध्ये सोन्याच्या दराबाबत अंदाज वर्तवला आहे. अहवालानुसार, सोन्याच्या किमती सध्या अनेक घटकांवर अवलंबून आहेत. जर हे घटक किमतींना आधार देत असतील, तर येथून किमती जास्तीत जास्त ३० टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आला आहे. मात्र, दर वाढवणाऱ्या घटकांना प्रतिकूल स्थिती निर्माण झाल्यास सोन्याच्या दरात घसरण होईल याकडेही रिपोर्टमध्ये लक्ष वेधण्यात आले आहे.
advertisement
सोन्याच्या दराबाबतचा अंदाज काय?
रिपोर्टनुसार, २०२६ मध्ये सोन्यावर तीन संभाव्य परिस्थितींचा परिणाम होऊ शकतो. जर अमेरिकन अर्थव्यवस्था थोडीशी मंदावली आणि फेडने सध्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त दर कमी केले तर सोने ५ ते १५ टक्क्यांनी महाग होऊ शकते. डॉलरमधील कमकुवतपणा आणि गुंतवणूकदारांचा जोखीम टाळणे या वाढीला आणखी बळकटी देईल.
दुसरीकडे, जर जग व्यापक मंदीकडे जात असेल, भू-राजकीय तणाव आणि आर्थिक अनिश्चितता वाढत असेल, तर सोन्याची मागणी झपाट्याने वाढू शकते आणि किंमती १५ ते ३० टक्क्यांनी वाढू शकतात. अशी स्थिती सोन्याच्या दरवाढीसाठी पोषक स्थिती निर्माण करतील.
मात्र, जर अमेरिकन अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा मजबूत राहिली, गुंतवणूक आणि मूल्यांकनांना वेग आला आणि व्याजदर वाढले, तर सोन्यावर दबाव येईल. या परिस्थितीत, डॉलर मजबूत होईल आणि गुंतवणूकदार जोखम असलेल्या गुंतवणुकीकडे परत येतील. यामुळे सोन्याच्या किमती ५ ते २० टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे.
हे दोन संकेत ठरणार महत्त्वाचे?
२०२६ चे चित्र दोन प्रमुख निर्देशकांमुळे अधिक गुंतागुंतीचे आहे, ज्यांना रिपोर्टमध्ये वाइल्डकार्ड म्हटले आहे. पहिले म्हणजे मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी आणि दुसरे म्हणजे पुनर्वापर पुरवठा. रिपोर्टनुसार, विकसनशिल अर्थव्यवस्थांमध्ये विकसित देशांपेक्षा अजूनही खूपच कमी सोन्याचे साठे आहेत. त्यामुळे जर जागतिक तणाव वाढला तर या देशांच्या खरेदीला वेग येऊ शकतो, ज्यामुळे सोन्याला अतिरिक्त आधार मिळू शकतो.
रिपोर्टनुसार, या वर्षी पुनर्वापर पुरवठा स्थिर राहिला आहे. दरम्यान, भारतात, या वर्षी लोकांनी संघटित क्षेत्राद्वारे २०० टन सोने गहाण ठेवले आहे. जर आर्थिक ताणतणावामुळे हे सोने विकले गेले किंवा किरकोळ गुंतवणूकदारांनी त्यांची विक्री वाढवली, किंवा त्यांनी जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन सोन्यावर अधिक लक्ष केंद्रित केले, तर २०२६ मध्ये सोन्याच्या किमतींवर दबाव निर्माण होऊ शकतो.
या वर्षी सोन्याच्या दरात वाढ का?
रिपोर्टनुसाप, या वर्षी सोन्याचा परतावा ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाला आहे, ज्यामुळे १९७१ नंतर सोन्यासाठी हे सर्वात मजबूत वर्ष बनले आहे. जगभरात सुरू असलेल्या भू-राजकीय तणाव, अमेरिकन डॉलरची कमकुवतता, व्याजदरात घट आणि सुरक्षित मालमत्तेसाठी गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे ही तेजी शक्य झाली आहे.
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणताही गुंतवणूकविषयी अथवा खरेदी-विक्रीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
