सोन्याच्या दरात उसळण...
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा परिणाम आता भारतीय बाजारपेठेवरही स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेषतः सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड उसळी पाहायला मिळत असून, आज जळगावसह देशभरात सोन्याच्या दरांनी ऐतिहासिक शिखर गाठले आहे. प्रथमच सोन्याचा दर जीएसटी वगळता प्रतिदहा ग्रॅम 1,00,000 रुपये इतका झाला आहे. जीएसटीसह हा दर 1,03,000 रुपये नोंदविण्यात आला आहे.
advertisement
चांदीच्या दरात उसळण...
फक्त सोनेच नाही, तर चांदीच्या किमतींमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात चांदीचा दर प्रतिकिलो 1,18,000 रुपये इतका नोंदवला गेला असून, हा दर आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. या वाढीमागे केवळ जागतिक संघर्षच नाही, तर भारत सरकारने अलीकडेच लागू केलेल्या आयात टॅरिफमधील बदलांचाही मोठा परिणाम आहे.
जागतिक घडामोडींचे पडसाद...
रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध अद्याप थांबण्याची चिन्हं दिसत नसल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातही अस्थिरता कायम आहे. त्याशिवाय, ट्रेड वॉरचंही सावट आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील गुंतवणूकदारांच्या मनःस्थितीवर आणि मौल्यवान धातूंच्या दरावर होत आहे.
जळगावमधील प्रमुख सुवर्ण व्यापाऱ्यांच्या मते, "सध्याची दरवाढ ही केवळ सुरुवात आहे. जागतिक पातळीवर अशीच स्थिती कायम राहिली, तर पुढील काही आठवड्यांत सोन्याचा दर 1.10 लाखांपर्यंत जाऊ शकतो." त्यामुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, गुंतवणूकदार मात्र या दरवाढीकडे संधी म्हणून पाहत आहेत.
