नवी दिल्ली : धनत्रयोदशी, दिवाळीच्या या सणासुदीच्या काळात सोन्याची चमक अक्षरशः झळाळून निघाली आहे. पण या वाढत्या तेजासोबतच भावांनी सर्वसामान्यांच्या कपाळावर आठ्या आणल्या आहेत. अनेक जण आता एकच प्रश्न विचारत आहेत “आता सोनं स्वस्त होईल का?” हा प्रश्न गुंतवणूकदार, ग्राहक आणि विवाहाची तयारी करणाऱ्या कुटुंबांसाठी विशेष महत्त्वाचा आहे.
advertisement
भारतात सोने हे फक्त धातू नाही, तर भावना आहे. बचत, परंपरा आणि सुरक्षिततेचे प्रतीक. मात्र आता सोन्याने सव्वा लाखाचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे सर्वांच्याच मनात शंका आहे की, आता सोन्याचे भाव कमी होणार का की आणखी वाढणार?
...तर सोने पुन्हा झेपावेल
काही अर्थतज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काही दिवसांत सोन्याच्या किंमती थोड्या खाली येऊ शकतात. पण जर जागतिक बाजारात तणाव कायम राहिला, तर किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. भारतात सण-उत्सव आणि लग्नसमारंभांच्या काळात सोन्याची मागणी वाढते, त्यामुळेही किंमतींना पुन्हा वरचा कल मिळू शकतो.
सोन्याची झेप कायम
equitymaster.com नुसार जागतिक बाजारात या पिवळ्या धातूची किंमत प्रति औंस $4,246.08 झाली आहे. तर भारतात ती 1,27,000 प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेली आहे. यामुळे सोने पुन्हा चर्चेचा विषय बनलं आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या मते, शुक्रवारी सकाळपर्यंत 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,27,471 प्रति 10 ग्रॅम इतकी पोहोचली.
2024 मध्ये जिथे निफ्टीने 8.7% परतावा दिला, तिथे सोन्याने 20% ची वाढ नोंदवली आणि 2025 मध्येही ही तेजी कायम आहे.
सोनं एवढं का वाढतंय?
1)अमेरिका-चीन व्यापार युद्ध आणि ट्रम्प यांची टॅरिफ नीती
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांमुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि चीनसोबतचा व्यापारी तणाव यांनी सोनं “सुरक्षित गुंतवणूक” म्हणून पुन्हा लोकप्रिय केलं आहे. जेव्हा आर्थिक संकटाची भीती वाढते, तेव्हा लोक शेअर विकून सोने खरेदी करतात.
ट्रम्प यांनी चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ लावले आणि प्रत्युत्तरादाखल चीननेही अमेरिकेवर कर वाढवला. अॅल्युमिनियम आणि स्टीलवर २५% सार्वत्रिक टॅरिफ लागू करण्यात आलं. ज्यामुळे जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार संरक्षणात्मक गुंतवणुकीकडे, म्हणजेच सोन्याकडे वळले.
2) जगभरात वाढती महागाई
सोन्याच्या किंमतींमध्ये वाढीचं दुसरं मोठं कारण म्हणजे महागाई. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अल्पकालीन काळात अमेरिकेतील महागाई दर वाढला आणि जागतिक पातळीवरही किंमती वाढल्या. इतिहास सांगतो की महागाई वाढली की सोने महाग होतं. कारण ते चलनघटीच्या विरोधात एक सुरक्षित कवच (hedge) मानलं जातं.
3) रशिया-युक्रेन युद्ध आणि इस्रायल-हमास संघर्ष
या दोन संघर्षांनी जागतिक वित्तीय बाजारांना हादरवून सोडलं. रशिया-युक्रेन युद्ध अजूनही थांबलेलं नाही, तर मध्यपूर्वेतील इस्रायल-हमास संघर्षाने भूराजकीय अस्थिरता वाढवली. या तणावामुळे गुंतवणूकदारांनी इतर मालमत्ता वर्गांऐवजी सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिलं. कारण अशा राजकीय अस्थिरतेच्या काळात सोने सर्वात सुरक्षित आश्रयस्थान (Safe Haven) ठरतं.
4) अमेरिकन मंदीची भीती
अमेरिकेतील व्यापारयुद्ध आणि वाढती महागाई यामुळे मंदीची छाया गडद होत आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते- जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदीची भीती वाढते, तेव्हा सोने सर्वात चांगली कामगिरी करतं. लोक शेअर्समधून पैसे काढून थेट सोन्यात गुंतवणूक करतात.
सोनं कधी स्वस्त होऊ शकतं?
-तज्ज्ञांच्या मतानुसार, सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण तेव्हाच होऊ शकते, जेव्हा काही अटी पूर्ण होतील:
-अमेरिकेतील महागाई दर अपेक्षेपेक्षा जलद गतीने कमी होईल.
-मध्यपूर्व आणि युक्रेनमध्ये स्थायी शांतता करार होईल.
-जगभरात नवीन भू-राजकीय संकटं (जसे तैवान प्रश्न) उद्भवणार नाहीत.
-आणि अमेरिकेत मंदीची भीती कमी होईल.
या सर्व घटकांपैकी काही जरी घडले तरी सोन्याच्या वेगात ब्रेक लागू शकतो. मात्र सध्या परिस्थिती पाहता, तेजीचं पारडं जड दिसतंय.
गुंतवणूकदारांसाठी सल्ला
तज्ज्ञांचा सल्ला आहे की- सोनेत गुंतवणूक करताना दीर्घकालीन दृष्टिकोन (2025-2026 आणि पुढे) ठेवा. सध्याची वाढ म्हणजे सोनं हमखास चांगलं गुंतवणूक साधन आहे. असं नाही कारण किंमत ही एकच मापदंड नसते.सोने गुंतवणुकीपूर्वी महागाई, जागतिक तणाव आणि व्याजदरांचे चढउतार या सर्व घटकांचा विचार करणं आवश्यक आहे.