सतत तिसऱ्या दिवशीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे जळगावच्या सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. ऐन दिवाळी व लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर दर कमी झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील तीन दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 15,000 रुपयांची घसरण झाली आहे. आज जळगाव बाजारात सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 31 हजार रुपये प्रति तोळा इतका नोंदवला गेला आहे. तर, चांदीचा दर एक लाख 70 हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
advertisement
केवळ तीन दिवसांपूर्वीच सोन्याचा दर एक लाख 35 हजारांवर, तर चांदीचा दर तब्बल एक लाख 85 हजारांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या तीन दिवसांत दरात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ग्राहकांचा आत्मविश्वास परत आला असून, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक सराफ दुकाने गाठत आहेत. दर कमी झाल्यामुळे विशेषतः लक्ष्मीपूजनासाठी सोन्याच्या दागिन्यांची, नाण्यांची आणि चांदीच्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.
शहरातील प्रमुख सराफ व्यापाऱ्यांच्या मते, “दरातील ही घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बातमी असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विक्रीत लक्षणीय वाढ होईल,” असे मत व्यक्त करण्यात आले. सुवर्णनगरी जळगावमध्ये दररोज सोनं-चांदीच्या बाजारात होणाऱ्या उलाढालीत आज पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ऐन सणासुदीच्या काळात या दरकपातीमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही समाधान लाभते आहे.