गेल्या अनेक महिन्यांपासून शांत वाटणाऱ्या रक्सौलमध्ये शुक्रवारी पहाटे 6 वाजता अचानक हालचाली वाढल्या. प्राप्तिकर विभाग (Income Tax) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) यांच्या संयुक्त पथकाने रक्सौलचे प्रसिद्ध व्यावसायिक मोहम्मद कलीम यांच्या ठिकाणांवर धाड टाकली. विशेष म्हणजे, ही कारवाई केवळ एक-दोन तासांची नव्हती; तर गेल्या 30 तासांहून अधिक काळ ही तपासणी सुरू आहे.
advertisement
मोहम्मद कलीम हे रक्सौलमधील एक बडे प्रस्थ मानले जातात. हिरो एजन्सी आणि तनिष्क शोरूमचे मालक असलेल्या कलीम यांच्यावर आयकर विभाग गेल्या सहा महिन्यांपासून पाळत ठेवून होता. गुप्त माहितीच्या आधारे, एका महिला डायरेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही हाय-प्रोफाइल रेड आखण्यात आली. आता या तपासाचा परीघ वाढला आहे, कलीम यांच्या नातेवाईकांसह त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या (CA) आश्रम रोडवरील निवासस्थानीही कसून चौकशी सुरू आहे.
तपास अद्याप अधिकृतपणे संपलेला नसला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत
अख्खी तिजोरी उघडली तेव्हा आत मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेमध्ये 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचाही समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. मालमत्तेशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आणि बेनामी व्यवहारांचा संशय व्यक्त केला जात आहे.
कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक पोलिसांऐवजी आता एसएसबी (SSB) या निमलष्करी दलाच्या जवानांनी मोर्चा सांभाळला आहे. रक्सौलच्या तांदूळ बाजार आणि परेवा भागासह पाच प्रमुख ठिकाणी सशस्त्र जवान तैनात आहेत. रस्त्यापासून ते दुकानांपर्यंत सर्वत्र केवळ खाकी वर्दीचा पहारा दिसत असल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे आणि कुतूहलाचे वातावरण आहे.
स्थानिकांच्या मते, रक्सौलच्या इतिहासात यापूर्वी एवढी मोठी आणि दीर्घकाळ चाललेली कारवाई कधीही झाली नव्हती. अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. "रेड पूर्ण झाल्यावरच नेमकी किती माया जमा झाली, हे स्पष्ट होईल," असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
