जर इराण आणि इस्रायल यांच्यात थेट युद्ध सुरू झाले, तर जागतिक पुरवठा साखळी (सप्लाय चेन) कोलमडू शकते आणि अनेक वस्तू महाग होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत भारतावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. भारत या दोन्ही देशांपासून काय वस्तू आयात करतो आणि कोणत्या वस्तू महाग होऊ शकतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
इस्रायलकडून भारत काय आयात करतो?
भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकालीन व्यापार संबंध आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने इस्रायलला 2.1 अब्ज डॉलर्सचा माल निर्यात केला असून 1.6 अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत प्रामुख्याने संरक्षण क्षेत्राशी संबंधित उपकरणे इस्रायलकडून आयात करतो. इस्रायल भारताचा 32वा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे.
भारत इस्रायलकडून खालील वस्तू आयात करतो:
रडार, सर्व्हेलन्स उपकरणे, लढाऊ ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि अन्य लष्करी हार्डवेअर, मोती आणि मौल्यवान दगड, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, रासायनिक उत्पादने आणि खते
इराणकडून भारत काय आयात करतो?
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताने इराणला 1.2 अब्ज डॉलर्सचा माल निर्यात केला असून 441.9 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत.
भारत इराणकडून खालील वस्तू आयात करतो:
कच्चे तेल, सुकामेवा, केमिकल्स आणि काचसामान
भारत इराणला खालील वस्तू निर्यात करतो:
बासमती तांदूळ,चहा, कॉफी,साखर
कोणत्या वस्तूंचे दर वाढू शकतात?
तज्ज्ञांच्या मते, इराण-इस्रायल संघर्ष वाढल्यास कच्च्या तेलाच्या किंमतीत तीव्र वाढ होऊ शकते. याचा परिणाम संपूर्ण आयात-निर्यात प्रक्रियेवर होईल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे सर्वसामान्य वस्तूंच्या दरातही वाढ होऊ शकते.
याशिवाय मिडल ईस्टमध्ये तणाव वाढल्याने विमानप्रवासाचे दरही वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी एअरस्पेस बंद असल्याने भारतीय विमान कंपन्या खाडीमार्गे प्रवास करतात. मात्र युद्धाच्या काळात त्या मार्गांवरही अडथळे येऊ शकतात. त्यामुळे त्यांना पर्यायी मार्ग शोधावे लागतील – ज्याचा थेट परिणाम विमान भाड्यांवर होईल.