बेंगळुरू: आयटी सेवा क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने 2026 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तब्बल 12,000 फ्रेशर्सची नियुक्ती केली असून वर्षअखेरपर्यंत 20,000 फ्रेशर्सची भरती करण्याच्या आपल्या उद्दिष्टाकडे कंपनी निश्चितपणे वाटचाल करत आहे.
कंपनीचे मुख्य वित्त अधिकारी जयेश सांघराजका यांनी 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल परिषदेत ही माहिती दिली. इन्फोसिसने सलग पाचव्या तिमाहीत एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली असून Q2FY26 मध्ये 8,203 आणि H1FY26 मध्ये एकूण 8,413 कर्मचाऱ्यांची भर पडली. आता कंपनीची एकूण हेडकाउंट 3,31,991 वर पोहोचली आहे.
advertisement
या तिमाहीसाठी कंपनीचा अॅट्रिशन दर (नोकरी सोडलेले कर्मचारी) घटून 14.3 टक्क्यांवर आला आहे. जो मागील तिमाहीत 14.4 टक्के होता.सांघराजका म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीला आमचे उद्दिष्ट 15,000 ते 20,000 फ्रेशर्स भरती करण्याचे होते. पण केवळ पहिल्या सहामाहीतच आम्ही सुमारे 12,000 फ्रेशर्स घेतले आहेत, त्यामुळे आम्ही या वर्षाच्या अखेरीस 20,000 फ्रेशर्सची भरती साध्य करू.
दरम्यान प्रतिस्पर्धी एचसीएलटेकने 2026 आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत 7,180 फ्रेशर्सची नियुक्ती केली आहे. इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांनी जुलै महिन्यात मनीकंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की कंपनीने पहिल्या तिमाहीतच 17,000 कर्मचाऱ्यांची भर घातली आहे आणि या वर्षी एकूण 20,000 पदवीधरांना नियुक्त करण्याची योजना आहे. कंपनी सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्लाऊड कम्प्युटिंग क्षेत्रातील वाढत्या मागणीत मोठ्या गुंतवणुकी करत आहे.
इन्फोसिसचा दुसऱ्या तिमाहीचा एकत्रित निव्वळ नफा वार्षिक 13.2 टक्क्यांनी वाढून 7,364 कोटी झाला आहे. ही वाढ मजबूत मार्जिन, उत्तम रोख प्रवाह आणि सातत्यपूर्ण डील वाढीमुळे झाली आहे. कंपनीने प्रति शेअर 23 इतका अंतरिम लाभांश जाहीर केला आहे, जो मागील वर्षाच्या तुलनेत 9.5 टक्क्यांनी अधिक आहे.
एकत्रित महसूल वार्षिक तुलनेत 8.6 टक्क्यांनी वाढून 44,490 कोटींवर पोहोचला. ऑपरेटिंग मार्जिन 21 टक्क्यांवर स्थिर राहिले, जे सीएनबीसी-टीव्ही18 च्या अंदाज 21.3 टक्क्यांपेक्षा किंचित कमी आहे.