नवी दिल्ली: तरुणांसाठी स्थिर नोकरी म्हणजे आयुष्याची दोरीच असते. घर चालवण्यासाठी, कुटुंबाला आधार देण्यासाठी नोकरीचं महत्त्व सर्वांनाच ठाऊक आहे. पण जेव्हा हीच नोकरी विषारी बनते, तेव्हा परिस्थिती असह्य होते. एखादा चांगला कर्मचारीसुद्धा ताण, अन्याय आणि दबावामुळे शेवटी राजीनामा देतो.
अशाच एका घटनेने सध्या सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. एका कर्मचाऱ्याचा "राजीनामा पत्र" इतका थेट आणि भन्नाट होता की, काही तासांत तो व्हायरल झाला आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या.
advertisement
व्हायरल झालेलं राजीनामा पत्र
‘JAY Decor’ ही टांझानियातील एक बांधकाम कंपनी आहे, ज्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर 1 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. या कंपनीने अलीकडेच त्यांच्या एका कर्मचाऱ्याचं राजीनामा पत्र शेअर केलं, ज्याचं नाव होतं ए.सी. मिन्झा (AC Minza). त्यांनी आपल्या बॉस आणि कंपनीच्या धोरणांमुळे त्रस्त होऊन नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.
पत्रातील शब्दांनी गाजवलं इंटरनेट
त्या राजीनामा पत्रात लिहिलं होतं...
“Dear Sir, I am resigning because in this company only targets increase, not salary. I work, I don’t perform magic.”
(“सर, मी राजीनामा देत आहे कारण या कंपनीत फक्त टार्गेट वाढतात, पगार नाही. मी काम करतो, जादू नाही.”)
हे पत्र कंपनीच्या अधिकृत शिक्क्यासह लिहिलं गेलं होतं, त्यामुळे त्याचं स्वरूप अधिक चर्चेचं ठरलं.
कंपनीची प्रतिक्रिया आणि लोकांचा प्रतिसाद
‘JAY Decor’ कंपनीने हे पत्र त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिलं की- आज आम्हाला हे राजीनामा पत्र मिळालं. हे खरंच आहे की मजेत लिहिलं गेलंय, याची खात्री नाही. कारण हे पान ऑफिस डायरीसारखं दिसतं. साधारणतः अशी पत्रं साध्या कागदावर किंवा ईमेलद्वारे दिली जातात. त्यांनी पुढे म्हटलं की या पत्राच्या खरीखुरीपणाची पुष्टी अजून झालेली नाही.
तरीही ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. 16,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि 100 पेक्षा अधिक कमेंट्स मिळाल्या.
एका युजरने लिहिलं- हे मी सेव्ह करून ठेवतो, नंतर वापरायला येईल!
दुसऱ्याने प्रतिक्रिया दिली- कर्मचाऱ्याचं म्हणणं अगदी बरोबर आहे — जबाबदाऱ्या वाढवल्या जातात पण पगार मात्र नाही.
तर आणखी एका कमेंटमध्ये म्हटलं होतं- जेव्हा पगार वाढत नाही, तेव्हा फक्त टार्गेट वाढवण्यात काही अर्थ नाही.
हा छोटासा पण तिखट राजीनामा आज अनेकांना आपल्या ऑफिसच्या वास्तवाचं आरशातलं प्रतिबिंब वाटतोय. जिथं कामगार मेहनत करतात, पण जादूची अपेक्षा ठेवली जाते.