राघवी तेलघाणा उद्योग यवतमाळ येथील रुपाली आशिष गायकी यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला. तेव्हा त्या सांगतात की, आमच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. पण, आता मुलं शिक्षणाची आहेत. त्यामुळे आर्थिक गणित लागत नाही. माझे मिस्टर एलआयसी एजेंट आहे. त्यांचा सुद्धा पगार जेमतेमच आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की, शेतीपुरक व्यवसाय उभारणी करायची. मग व्यवसाय नेमका कोणता निवडायचा? तर आता आरोग्याविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे भेसळयुक्त पदार्थ लोक घेत नाही. त्यांचा कल आता नैसर्गिक पदार्थांकडे वाढला आहे. हा विचार करून आम्ही लाकडी तेलघाणा उद्योग सुरू करण्याचा विचार केला.
advertisement
विचार केल्यानंतर भांडवल जुळत नव्हते. त्यासाठी आम्ही युनियन बँक ऑफ इंडिया कडून 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याचबरोबर पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या योजनेतून 35 टक्के अनुदान मिळाले. अशा 3.5 लाख रुपयांची मशीन गुजरातमधून खरेदी केली. सध्या यवतमाळमध्ये 6 लाकडी तेलघाणा उद्योग आहेत. आम्ही सर्वांनी मिळून संघ तयार केला. शेतकऱ्यांकडून कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून आम्ही विकत आहे.
फेब्रुवारी 2024 मध्ये 5 लाख गुंतवणूक करून आम्ही हा व्यवसाय सुरू केला. काही दिवसातच आम्हाला चांगला प्रतिसाद मिळू लागला. आमच्या येथून महिन्याला 200 लिटर भुईमुग तेल आणि 10 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त उर्वरित तेल तेल विकले जात आहे. भुईमुग तेल हे 290 रुपये किलो दराने सध्या विकत आहे. तर इतर तेलांची किंमत ही 400 रुपयांच्यावर आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आमचे आर्थिक गणित जुळले आणि एका नवीन व्यवसायाची चांगली सुरवात झाली. पुढे हा व्यवसाय आणखी चांगला भरारी घेणार आहे. कारण सध्या या तेलाला खूप मागणी आहे, असे रुपाली सांगतात.