तासगाव तालुक्यातील नागावच्या सविता संतोष पाटील यांनी अडीच वर्षांपूर्वी राहत्या घरातूनच अन्न प्रक्रिया उद्योग चालू केला. बी.एस.सी. नंतर दीड वर्ष त्यांनी खाजगी कंपनीमध्ये मार्केटिंग विभागात काम केले होते. बी.एस.सी केमिस्ट्रीचे शिक्षण घेऊन देखील लग्नानंतर त्यांनी कुटुंबासाठी वेळ देण्याचे ठरवले. मुलं थोडी मोठी झाल्यानंतर पुन्हा नोकरीच्या मागे न लागता त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. अडीच वर्षांपूर्वी कुटुंबासोबत राहत त्यांनी अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला. किलो दोन किलो पासून सुरू केलेला व्यवसाय आता टनामध्ये विस्तारला आहे. स्वतःच्या एक गुंठा जागेमध्ये शेड उभारून त्यांनी आता अन्न प्रक्रिया उद्योगाचे युनिट उभारले आहे. न्यू चिरायू फूड प्रॉडक्ट नावाने त्या पापड, लोणची, चटण्या, लाडू, फरसाण, बिस्किटे असे शंभरहून अधिक प्रकारचे पदार्थ बनवतात.
advertisement
घरच्या चवीला वाढती पसंती
सविता यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये बनणाऱ्या प्रत्येक पदार्थ घरगुती पद्धतीने बनवला जातो. ऑर्डरप्रमाणे पदार्थ बनवून देतात. आरोग्याच्या दृष्टीने योग्य पदार्थ, लहान मुलांना खायला आवडतील असे पदार्थ तसेच वृद्ध लोकांना आणि शुगर पेशंटला खायला चालतील अशा पदार्थांचे वेगवेगळे प्रकार त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. काही मशीन आणि ओवनच्या मदतीने बनवलेल्या पदार्थांना चुल्हीची भट्टी देखील देतात. चटकदार पदार्थांना आणि घरच्या चवीला परिसरातील ग्राहकांची पसंती वाढत असल्याचे सविता यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
महिलांना वर्षभरासाठी रोजगार
सविता यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगाचे काम वर्षभर सुरू राहते. उन्हाळ्यामध्ये उन्हाळी पदार्थांना मोठी मागणी असते. पौष्टिक चटण्या, पौष्टिक लाडू, गव्हाची बिस्किटे, शुद्ध डाळीपासून बनवलेला फरसाण यांना वर्षभर मागणी राहते. तसेच दिवाळीमध्ये फराळाचे पदार्थ आणि लग्न सराईतील रुखवताचे पदार्थ, डोहाळे जेवण, नामकरण सोहळे, वाढदिवस अशा सणसमारंभाच्या ऑर्डर स्वीकारून सविता पाटील सहा महिलांना वर्षभरासाठी रोजगार देत आहेत.