TRENDING:

'आउट ऑफ कंट्रोल' चांदी 3,18,000वर; आता विकत घ्यावी का? पुढच्या 24 तासांत बाजारात होणार मोठी उलथापालथ, तज्ज्ञांचा इशारा!

Last Updated:

Silver Price: चांदीने 3 लाख रुपयांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडून बाजारात खळबळ माजवली असून, ही तेजी जागतिक युद्धाच्या सावटाखालील मोठ्या आर्थिक संकटाची नांदी तर नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे. गुंतवणूकदार नफा कमवण्याच्या आनंदात असतानाच, तज्ज्ञांनी दिलेल्या 'मार्केट क्रॅश'च्या इशाऱ्यामुळे आता सर्वांची धाकधूक वाढली आहे.

advertisement
मुंबई: भू-राजकीय तणाव आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकलेल्या गुंतवणूकदारांमुळे चांदीने इतिहास रचला आहे. 19 जानेवारी रोजी मल्टी कमॉडिटी एक्सचेंज (MCX) वर चांदीचा भाव थेट 3 लाख रुपये प्रति किलोच्या पुढे गेला. दुपारी 12.29 वाजता चांदीने 3,04,087 रुपये प्रति किलो असा नवा उच्चांक गाठत एका सत्रात तब्बल 5.67 टक्क्यांची उसळी घेतली.
News18
News18
advertisement

गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात सुमारे 206 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. याआधीचा उच्चांक 15 जानेवारी 2026 रोजी 2,92,96 रुपये प्रति किलो इतका होता.

जागतिक तणावाचा थेट परिणाम

जागतिक बाजारात अस्थिरता वाढल्यानंतर चांदीच्या दरांनी वेग घेतला. अमेरिका आणि युरोपमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडशी संबंधित वादावरून युरोपीय देशांवर 25 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा इशारा दिल्याने गुंतवणूकदार सावध झाले.

advertisement

या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीसारख्या पारंपरिक सुरक्षित पर्यायांकडे गुंतवणूक वाढली. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर स्पॉट सिल्व्हरने 94.36 डॉलर प्रति औंस असा सर्वकालीन उच्चांक गाठला, तर नंतर तो 93.18 डॉलर दरम्यान स्थिरावला, जो मागील सत्रापेक्षा 5.25 टक्के अधिक होता.

पुरवठा तुटवडा आणि चीनचा प्रभाव

कॉमेक्स वेअरहाऊसमधून चांदी पुन्हा युरोपकडे वळू लागल्याने भौतिक तुटवड्याची तीव्रता काहीशी कमी होत असल्याची चिन्हे आहेत. मात्र, किंमती अजूनही उच्च पातळीवर आहेत. महाग भावांमुळे औद्योगिक मागणीवर थोडासा परिणाम होऊ शकतो, पण चीनमधील सट्टेबाज मागणी अजूनही मजबूत असल्याचे दिसते.

advertisement

शांघायमधील चांदीचे दर लंडनच्या तुलनेत सुमारे 10 डॉलरने जास्त आहेत, यावरून प्रादेशिक मागणीतील तफावत स्पष्ट होते. चॉइस ब्रोकिंगचे कमोडिटी आणि करन्सी विश्लेषक आमिर मकदा यांच्या मते, “चीनच्या कडक निर्यात परवानग्या आणि मर्यादित खाण उत्पादनामुळे बाजारात संरचनात्मक पुरवठा तुटवडा निर्माण झाला असून साठे मोठ्या प्रमाणात घटले आहेत.”

औद्योगिक मागणीही मजबूत

सुरक्षित गुंतवणुकीव्यतिरिक्त, चांदीला औद्योगिक क्षेत्रातूनही मोठा आधार मिळतो आहे. स्वच्छ ऊर्जा, सोलर पॅनल्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील वाढती मागणी चांदीच्या किमतींना बळ देत आहे. गुंतवणूक प्रवाहामुळे अस्थिरताही वाढताना दिसते.

advertisement

चांदीत गुंतवणूक करावी का? खरेदी, होल्ड की विक्री?

ऑक्टोबर 2025 मध्ये सुमारे 45 डॉलर प्रति औंस पासून सुरू झालेली चांदीची तेजी डिसेंबरमध्ये 82.7 डॉलरपर्यंत पोहोचली. तज्ज्ञांच्या मते ही तेजी अजून थांबलेली नाही.

VT मार्केटचे APAC सीनियर मार्केट अ‍ॅनालिस्ट जस्टिन खू म्हणतात, 3 लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार करणं ही केवळ आकड्यांची खेळी नाही, तर जागतिक अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावात वाढलेल्या सुरक्षित मागणीचं प्रतिबिंब आहे. ही तेजी अल्पकालीन नसून दीर्घकालीन संरचनात्मक ट्रेंडचा भाग आहे.

advertisement

मात्र ते सावधगिरीचा सल्ला देतात. सध्याच्या उच्चांकांवर भावांचा पाठलाग करणं टाळावं. अल्पकालीन ट्रेडर्ससाठी नफा वसुली योग्य ठरू शकते. पण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांदी अजूनही महागाईविरोधी संरक्षण ठरू शकते, असे खू यांनी सांगितले.

ऑगमाँटच्या रिसर्च हेड रुप्शा चैनानी यांच्या मते, सध्याच्या पातळीवर आक्रमक खरेदी टाळून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी. आधीच गुंतवणूक असलेल्यांनी ती होल्ड ठेवावी आणि तीव्र उसळीवर आंशिक नफा बुक करावा. 2.85 ते 2.90 लाख या सपोर्ट लेव्हल्स तुटेपर्यंत दीर्घकालीन चित्र सकारात्मक आहे.

पुढे काय?

बाजाराचे लक्ष आता अमेरिकेच्या PCE महागाई आकडेवारीकडे आणि Q3 GDP च्या अंतिम डेटाकडे लागले आहे. अल्पकालीन अस्थिरता कायम राहू शकते, पण एकूणच जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती चांदीसाठी अनुकूल असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ऑगमाँटच्या अहवालानुसार, चांदीमध्ये खरेदीदार आणि विक्रेते दोन्ही बाजूंनी सट्टेबाजी वाढली असून त्यामुळे दरात तीव्र चढ-उतार दिसत आहेत. पुढील टप्प्यात 99–100 डॉलर (3.20 लाख रुपये) आणि त्यानंतर 107 डॉलर (3.40 लाख रुपये) हे महत्त्वाचे रेसिस्टन्स स्तर मानले जात आहेत.

मात्र आमिर मकदा यांनी तांत्रिक चार्ट्सचा हवाला देत इशारा दिला आहे. डेली चार्टवर RSI बेअरिश डायव्हर्जन्स दिसतो आहे, म्हणजे भाव वाढत असले तरी अंतर्गत गती कमी होत आहे. ओपन इंटरेस्टमध्येही घट दिसत असून लॉन्ग अनवाइंडिंगची शक्यता आहे. सध्या लॉन्ग पोझिशन असलेल्यांनी नफा वसुलीचा विचार करावा, असे ते म्हणाले.

मराठी बातम्या/मनी/
'आउट ऑफ कंट्रोल' चांदी 3,18,000वर; आता विकत घ्यावी का? पुढच्या 24 तासांत बाजारात होणार मोठी उलथापालथ, तज्ज्ञांचा इशारा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल