माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. मॉरिस भाई नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वतःला समाजसेवक म्हणतो. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचं बोललं जातंय. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस भाई यांच्यात आधी अनेक वाद होते मात्र दोघांमधील वाद संपवून हे दोघे एकत्र आले. माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे गुरुवारी सायंकाळी मॉरिस भाईच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह आले होते. या लाईव्हमध्ये मॉरीस भाईने अभिषेक घोसाळकर यांचं स्वागत केलं आणि सर्व मतभेद विसरून आपण दोघे एकत्र आल्याचे त्याने सांगितलं. त्यानंतर दोघेजण त्यांच्या परिसरासाठी कोणत्या गोष्टी करणार आहोत? याविषयी त्यांनी माहिती दिली.
advertisement
फेसबुक लाईव्ह दरम्यान दोघांमध्ये काय बोलणं झालं?
मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांनी बोलताना म्हटलं की, " एक चांगलं व्हिजन घेऊन आम्ही सोबत आलो आहोत. नवीन वर्षात लोकांचा फायदा कशात आहे हे लक्षात घेऊन आम्ही काम करू. आम्ही आज 300 लोकांना साडी आणि रेशन वाटण्याच कार्य केलं. तसंच 10 तारखेला मुंबई ते नाशिक, आणि नाशिक ते मुंबई ट्रिपसाठी बसेस पाठवणार आहोत. गणपत पाटील नगर, बोरिवली, आयसी कॉलनी, इत्यादी प्रभागातील लोकांची चांगली सेवा करण्याचा प्रयत्न करू" असं त्यानं सांगितलं. हे बोलून मॉरीस स्क्रीन समोरून दूर झाला आणि शेवटी काहीवेळ घोसाळकर यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
फेसबुक लाईव्हच्या शेवटी घोसाळकर म्हणाले की, " आमच्यामध्ये अनेक मतभेद होते परंतु हे मतभेद दूर करून आम्ही आता एकत्र आलोय आणि लोकांसाठी नक्कीच चांगलं काम करू. अजून पुढे एकमेकांसोबत खूप चांगली काम करायची आहेत ही तर फक्त सुरुवात आहे. आपण बाहेर जाऊ आणि कामाला सुरुवात करू."
असं सांगून अभिषेक घोसाळकर हे त्यांच्या खुर्चीवरून उठले तेवढ्यात समोर उभे असलेल्या मॉरिसने घोसाळकर यांच्यावर पिस्तूल ताणून गोळ्या झाडल्या. एकूण 5 गोळ्या घोसाळकरांवर झाडण्यात आल्या ज्यात त्यांचा मृत्यू झाला.