विरार पूर्वेच्या फुलपाडा परिसरात मामा नगरमध्ये 'अरुणदिप प्लाझा' नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर अखिलेश विश्वकर्मा (वय ३६) हे पत्नी सुषमा आणि मुलांसह राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अखिलेश यांनी आपल्या बेडरूममध्ये स्वतःला पेटवून घेतले. कर्जबाजारीपणामुळे निराश होऊन अखिलेश यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
बेडरूममधून आगीचे लोट बाहेर येताना पाहताच, अखिलेश यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी सुषमा विश्वकर्मा (वय ३२) आणि भाचा लक्ष्मिकांत विश्वकर्मा (वय ३०) धावले. मात्र, या प्रयत्नात ते दोघेही गंभीररीत्या भाजले.
advertisement
ही घटना घडताच इमारतीमधील रहिवाशांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र, या दुर्घटनेत अखिलेश विश्वकर्मा यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अखिलेश यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची पत्नी सुषमा किरकोळ जखमी झाली आहे, तर भाचा लक्ष्मिकांत विश्वकर्मा हा गंभीर भाजला असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अखिलेश विश्वकर्मा यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यांनी नेमकी कोणत्या पद्धतीने आग लावली, याबाबत तपास सुरू आहे.
