ठाणे :
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. अक्षयला तळोजा कारागृहातून ठाण्यात चौकशीसाठी नेत असताना ही घटना घडली. अक्षयने पोलिस व्हॅनमध्ये पोलिसाची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेत गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ झाडण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी पोलिस अधिकाऱ्यांनीच व्हॅनमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती दिलीय.
advertisement
अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याला कारागृहातून नेल्यापासून ते एन्काउंटरपर्यंत काय घडलं हे सांगितलं. ते म्हणाले की, ''काल साधारण संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तळोजा मध्यवर्ती कारागृहातून आरोपी अक्षय शिंदे याचा कायदेशीर ताबा घेतला. आम्ही अक्षयला घेऊन ठाणे येथील आमचे गणेशा के एकचे कार्यालय येथे जात होतो. तेव्हा माझ्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजीत मोरे, पोलीस हवालदार हरीश तावडे हे तिघे होते. अक्षय शिंदे याला आम्ही ताब्यात घेतल्यानंतर आरोपीला घेऊन जाणारी व्हॅन असल्यामुळे मागे एपीआय निलेश मोरे, हवालदार अभिजीत मोरे आणि हरीश तावडे हे तिघं अक्षय शिंदे या आरोपी सोबत बसले होते आणि मी पुढे ड्रायव्हरच्या सीट येथे बसलो होतो.''
अचानक शीळ डाऊघर येथे पोलीस व्हॅन आली असता मला सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितले की, “अक्षय शिंदे हा जोरात ओरडत आहे.” यामुळे मी गाडी थांबवली आणि मागे गाडीत जाऊन बसलो. माझ्या समोरच्या सीटवर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, त्यांच्या बाजूला आरोपी अक्षय शिंदे आणि त्यानंतर पोलीस हवालदार अभिजीत मोरे असे तिघे बसले होते. मी अक्षय शिंदेला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो शिवीगाळ करत होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पोलीस व्हॅन मुंबई येथील व्हाय जंक्शन ब्रिजवर आली असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास अक्षय शिंदे याने अचानक सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेला असलेले सरकारी पिस्तूल बळाचा वापर करत हिसकावण्याचा प्रयत्न केला. “मला जाऊ द्या,” असे तो म्हणत होता. या झटापटीत निलेश मोरे यांचे पिस्तूल लोड झाले व त्यातील एक राऊंड हा निलेश मोरे यांच्या डाव्या मांडीत घुसल्याने निलेश मोरे खाली पडले.
अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांचे पिस्टल घेऊन “आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही,” असे रागाने ओरडून बोलू लागला होता. अक्षयने अचानक हवालदार हरीश तावडे यांच्या दिशेने पिस्टल रोखून त्यांना जीवे ठार मारण्याचे उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या. परंतु आमच्या नशिबाने त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत. आरोपी अक्षय शिंदे यांचे रौद्ररूप व देहबोली पाहून तो त्याच्याकडे असलेल्या पिस्टलमधून गोळ्या झाडून जीवे मारणार अशी आमची पूर्णपणे खात्री झाली. मी प्रसंगावधान राखून व माझे सहकारी यांचे संरक्षणाकरता माझ्याकडील पिस्टलने एक गोळी अक्षयच्या दिशेने झाडली असं पोलीस अधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.
संजय शिंदे म्हणाले की, “अक्षय शिंदे जखमी झाला आणि तो खाली पडला. त्याच्या हातून पिस्टल सुटली. त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर वाहन चालकाला सूचना देऊन वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल, कळवा येथे आणले. आरोपी अक्षय शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांना उपचारासाठी दाखल केले. आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी मृत झाला असल्याचे मला नंतर समजले.”
