चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी
कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये भाजपने तुषार आपटे याला संधी दिली आहे. विशेष म्हणजे, आपटे हा दोन वर्षांपूर्वी बदलापूरमधील शाळेत घडलेल्या चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणात सहआरोपी आहेत. त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि शाळेच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले होते. आता अशा व्यक्तीला थेट नगरपालिकेत सन्मानाचे पद दिल्याने शहरात संतापाची लाट असून सर्वसामान्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
advertisement
एकूण 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड
शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण 5 स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे 2, शिवसेनेचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 1 सदस्याचा समावेश आहे. मात्र, आपटे यांची नियुक्ती ही सर्वाधिक वादाचा केंद्रबिंदू ठरली आहे. स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष असतानाच हा धक्कादायक निर्णय समोर आला आहे.
अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू
या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता, तर तुषार आपटे हे अनेक दिवस फरार होते. तब्बल 44 दिवसांनंतर त्यांना अटक झाली होती, पण अवघ्या 48 तासांत त्यांना जामीन मिळाला. या काळातही ते शैक्षणिक संस्थेवर कार्यरत होते आणि निवडणुकीतही सक्रिय होते. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सभेत भाजपच्या 2, शिवसेनेच्या 2 आणि राष्ट्रवादीच्या 1 सदस्याची निवड झाली, पण आपटे यांच्या नियुक्तीवरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
पडसाद स्थानिक राजकारणात
दरम्यान, विरोधकांनी या निर्णयावरून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे. गंभीर गुन्ह्यात नाव असलेल्या व्यक्तीला लोकशाहीच्या पवित्र मंदिरात स्थान देणे चुकीचे असल्याचे बोलले जात आहे. शहराच्या प्रतिमेला या निर्णयामुळे धक्का पोहोचेल अशी भीती अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात या प्रकरणाचे पडसाद स्थानिक राजकारणात मोठ्या प्रमाणावर उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
