अपुऱ्या बसेसचा ताफा आणि सतत प्रवाशांच्या मागण्यांमुळे बेस्टने मुंबई आणि उपनगरातील अनेक ठिकाणांवरील बसेसच्या मार्गांमध्ये मोठे फेरबदल केले आहेत. शनिवारपासून (1 नोव्हेंबर) 23 पुनर्रचित मार्गावर नवीन बस धावणार आहेत. आठ मार्गावरील बसचे एसी बसमध्येही रूपांतर करण्यात आले आहेत. शिवाय, वर्ल्ड ट्रेड सेंटर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हा ए-207 बस क्रमांकाचा नवीन बसमार्गही सुरू करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरातील रस्त्यावर बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील 2,700 इतक्या बसेस दररोज धावत आहेत. आता यामध्ये आणखीन नव्याने बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.
advertisement
मुंबई आणि उपनगरातील रस्त्यावर बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या आणि भाडे तत्त्वावरील 2,700 इतक्या बसेस दररोज धावतात. त्यातून दररोज सरासरी 30 लाख इतके प्रवासी प्रवास करतात. नवीन बदलांमुळे गर्दीच्या वेळी बेस्ट बसची मेट्रो स्थानकांना, प्रमुख रेल्वे स्थानकांना आणि खासगी- सरकारी कार्यालयांना प्रभावीपणे जोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो आणि रेल्वेमधून प्रवास झाल्यानंतर तत्काळ बसमधून इच्छितस्थळी जाता येईल. त्याचा मोठा फायदा शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, कार्यालयीन कर्मचारी, महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना होईल, असा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे.
बेस्टच्या ताफ्यात नुकत्याच 157 इलेक्ट्रिक एसी बस दाखल झाल्या आहेत. रेल्वेच्या धक्काबुक्कीच्या प्रवासानंतर प्रवाशांना एसी बसमधून थोडासा दिलासादायक प्रवास करता येणार आहे. 'बेस्ट'ने वर्ल्ड ट्रेड सेंटर ते सीएसएमटी हा नवा मार्ग सुरू केला असून हा नवा मार्ग जी. डी. सोमानी मार्ग, कुलाबा मार्केट, बेरेक नं.1, नवी नगर, सह्याद्री नगर, एल्फिन्स्टन ब्रीज, दादर, प्रभादेवी,महालक्ष्मी, हाजी अली, पेडर रोड, गिरगाव चौपाटीमार्गे सीएसएमटी असा बसचा मार्ग असेल. सरकारीसह विविध खासगी संस्थांमध्ये काम करणाऱ्या नोकरदारांना या बसचा विशेष फायदा होणार आहे. गोरेगाव, दिंडोशी, ठाणे लिंक रोड, विक्रोळी, घाटकोपर- अंधेरी, भांडुप आणि मुलुंड परिसरातील बस मार्गाचा विस्तार केल्याने पूर्व उपनगरातील नागरिकांसाठी प्रवासी सुविधा अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ होण्याची ही शक्यता आहे.
'या' वातानुकूलित बस मार्गामध्ये फेरबदल होणार
- ए-207- मालवणी आगार ते दहिसर बसस्थानक
- ए-211-वांद्रे बसस्थानक ते फादर अँग्नेल आश्रम
- ए-215-वांद्रे रेक्लेमेशन ते टाटा वसाहत
- ए-399-ट्रॉम्बे ते महाराणा प्रताप चौक (मुलुंड)
- ए-410-विक्रोळी आगार ते महाकाली गुंफा
- ए-604-नागपाडा स्थानक ते महाकाली मुहा
- ए-605-भांडुप स्टेशन ते टेम्भीपाडा
- ए-606-भांडुप स्टेशन ते अशोक केदारे चौक
