ऑनलाईन बाईक टॅक्सी बुकिंगवर बंदीची शक्यता
महाराष्ट्राभर घडत असलेल्या या घटनांमुळे राज्यातील बाइक टॅक्सी सेवा सुरू ठेवाव्यात की नाही तसेच रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांना देण्यात आलेले तात्पुरते परवाने रद्द करावेत का याबाबत परिवहन मंत्री आणि वरिष्ठ परिवहन अधिकाऱ्यांमध्ये बुधवारी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आढावा घेत पुढील कठोर निर्णय घेण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
बंदीचे कारण काय?
सध्या अनेक खासगी कंपन्यांच्या बेकायदेशीररीत्या बाइक टॅक्सी सेवा सुरू असल्याचा आरोप आहे. ज्यामुळे बाइक टॅक्सीच्या अपघातांत प्रवाशांचा मृत्यू होणे तर काही प्रवाशांना कायमस्वरूपी अपंगत्व येणे अशा घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच कल्याण येथे एका बाइक टॅक्सी चालकाने तरुणीच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना नुकतीच उघडकीस आली असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबईसह राज्यातील काही भागांत बाइक टॅक्सी सेवांना अधिकृत परवानगी नसताना विविध अॅग्रिगेटरमार्फत या सेवा सुरू आहेत. विशेषतहा मुंबई महानगर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बाइक टॅक्सी धावत असल्याचे चित्र आहे. पेट्रोलवर चालणाऱ्या बाइक टॅक्सीवर स्पष्ट मनाई असतानाही नियम धाब्यावर बसवून अशा दुचाकी रस्त्यावरून प्रवाशांना घेऊ जात आहेत.
अपघाती मृत्यू, गंभीर दुखापती आणि विनयभंगासारख्या गुन्हेगारी घटनांमुळे बाइक टॅक्सीने प्रवास करणे प्रवाशांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता, कायद्याची अंमलबजावणी आणि नियमांचे उल्लंघन यावर कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या सर्व बाबींचा विचार करून राज्य सरकारकडून बाइक टॅक्सी सेवांबाबत मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
