भाजप उमेदवार तेजस्वी घोसाळकर यांच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये आज सकाळी साडेसात वाजल्यापासूनच मतदान प्रक्रियेदरम्यान मतदारांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मतदान केंद्र शोधण्यात होणाऱ्या अडचणी आणि व्यवस्थेतील गोंधळामुळे मतदारांमध्ये नाराजी होती. याचदरम्यान मतदान केंद्राबाहेर मनसे आणि भाजप यांच्यात वाद उफाळून आल्याची घटना घडली आहे.
मनसे-शिवसेनेचे भगवे गार्ड मतदान केंद्राबाहेर राडा घालत असल्याचा आरोप करण्यात आला. हा वाद भाजप आमदार मनीषा चौधरी यांच्या विरोधात मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकच तीव्र झाला त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेऊन एमएचबी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मनसेचे भगवे गार्ड यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
advertisement
दरम्यान या वादामुळे काही काळ मतदान प्रक्रियेवर परिणाम झाला असून, निवडणूक प्रशासनाने शांततेत मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
तेजस्वी घोसाळकर भावूक...
तेजस्वी घोसाळकर यांनी मतदानाला जाण्यापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी अश्रू अनावर झाले. तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, आज अभिषेकची आठवण येत आहे. अभिषेक असता तर निवडणुकीचा आनंद वेगळा असता. अभिषेक सगळी निवडणूक हाताळायचा असे त्यांनी सांगितलं. त्यांनी पुढे म्हटले की, कुटुंब आणि राजकारण हे वेगळं आहे. वडीलधारे म्हणून त्यांचा आशिर्वाद आहे. पण, त्यांची राजकीय भूमिका वेगळी, माझी वेगळी आहे. अभिषेक आणि मी केलेले काम हे लोकांसमोर आहे, त्या विकास कामावर लोक मला मतदान करतील असा विश्वास त्यांनी केला.
