तुम्हाला वाटेल की मुंबईतील रेस्टॉरंटचा इराणमधील राजकीय घडामोडींशी काय संबंध? पण दक्षिण मुंबईतील या टेबलवर वाढल्या जाणाऱ्या पुलावाची चव थेट इराणच्या संघर्षाशी जोडलेली आहे. इराणमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीचा फटका चक्क मुंबईकरांच्या लाडक्या बेरी पुलावला बसणार आहे.
इराणमधील तणाव आणि मुंबईतील ताट
इराणमध्ये सध्या सरकारविरोधी आंदोलने आणि निर्बंधांमुळे मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. या संघर्षाचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय व्यापारावर झाला आहे, ब्रिटानिया रेस्टॉरंटचे मालक अफशीन कोहिनूर (६५) सध्या चिंतेत आहेत. कारण, त्यांच्या पुलावची मुख्य ओळख असलेला 'झेरेश्क बेरी' (Zereshk Barberries) या विशेष बेरीचा साठा आता संपत आला आहे.
advertisement
कोहिनूर सांगतात की, "गेल्या शुक्रवारी आणि मंगळवारी इराणहून येणारे विमान आलेच नाही. माझ्याकडे आता फक्त 15-16 किलो बेरी शिल्लक आहेत, ज्या जेमतेम पुढच्या 15 दिवसांसाठी पुरतील."
ब्रिटानिया रेस्टॉरंटमध्ये पुलावचे सात प्रकार मिळतात, जे त्यांच्या एकूण विक्रीच्या 50% वाटा उचलतात. इराणमधील 'यझद' (Yazd) शहरातून खास मागवल्या जाणाऱ्या या आंबट-गोड 'रुबी रेड' बेरीज या पुलावचा आत्मा आहेत. अनेक रेस्टॉरंट्स या डिशसाठी क्रेनबेरी वापरतात, पण कोहिनूर आजही इराणहून येणाऱ्या अस्सल बारबेरीजवरच ठाम आहेत.
केवळ बेरीच नाही, तर इराणहून येणारा मध, पिस्ता, हेझलनट्स आणि प्रसिद्ध 'गाझ' (Persian Nougat) यांचा पुरवठाही विस्कळीत झाला आहे.
1982 मध्ये जेव्हा अफशीन कोहिनूर व्यवसायात आले, तेव्हा त्यांच्या आईने म्हणजेच 'बचा' कोहिनूर यांनी ही रेसिपी सुरू केली होती. सुरुवातीचे सहा महिने हा पुलाव फ्लॉप ठरला होता. पण नंतर त्यांनी भारतीय चवीनुसार त्यात मसाला, ग्रेव्ही आणि गोट्यांच्या आकाराचे कबाब टाकले आणि बघता बघता हा पुलाव मुंबईची ओळख बनला.
खवय्यांनो घाबरू नका
प्रसिद्ध खाद्यलेखक कुणाल विजयकर म्हणतात की, "ब्रिटानियाचा बेरी पुलाव अप्रतिम असतो. पण बेरी नसतील तरीही तो पुलाव चविष्टच लागेल." तर इतिहासकार कुरुश दलाल यांच्या मते, या बेरी अफगाणिस्तान, इराक किंवा ताजिकिस्तानमार्गेही येऊ शकतात, त्यामुळे पुरवठा पूर्णपणे थांबणार नाही.
स्वतः अफशीन कोहिनूर मात्र आशावादी आहेत. रेस्टॉरंटच्या कॅश काउंटरवर बसून आपल्या 'मिस्टर बोझो' (मांजर) आणि 'मिस्टर जुलू' (कुत्रा) सोबत खेळताना ते हसून म्हणतात, "इराणमधील हा तणाव जास्त काळ टिकणार नाही आणि आमचा बेरी पुलाव कुठेही जाणार नाही."
