सीएसएमटीवरील गर्दी आणि ताण कमी करण्याचा प्रयत्न
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा ताण निर्माण होतो. विशेषतहा उत्तर भारतातून मुंबईकडे येणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या उशिरा दाखल होत असल्याने लोकल सेवांवर त्याचा थेट परिणाम होतो. सीएसएमटीकडे येणाऱ्या एक्सप्रेसची संख्या मर्यादित केल्यास लोकलसाठी अधिक वेळ आणि ट्रॅक उपलब्ध होईल असा रेल्वे प्रशासनाचा अंदाज आहे.
advertisement
मार्गिकेअभावी लोकल मार्गावर वळणाऱ्या एक्सप्रेस
कल्याणहून मुंबईच्या दिशेने येताना विद्याविहार-कुर्ला भागापर्यंत सहावी मार्गिका उपलब्ध असल्याने एक्सप्रेस गाड्या त्या टप्प्यापर्यंत स्वतंत्र मार्गावरून येतात. मात्र पुढे सीएसएमटीपर्यंत स्वतंत्र मार्ग नसल्याने या एक्सप्रेस गाड्यांना लोकल मार्गावर वळवावे लागते. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडते, गाड्या उशिरा धावतात आणि प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो.
एलटीटीकडे वळवल्यास सकाळचा गोंधळ टळणार
हीच अडचण दूर करण्यासाठी काही एक्सप्रेस गाड्यांचे संचलन सीएसएमटीऐवजी एलटीटी येथून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे या गाड्या विद्याविहार परिसरातून थेट एलटीटीच्या दिशेने वळतील आणि सकाळच्या सत्रात मुख्य मार्गावर होणारा विलंब मोठ्या प्रमाणात कमी होईल.
पंचवटी एक्सप्रेससह काही गाड्यांचा प्रस्तावात समावेश
रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावामध्ये पंचवटी एक्सप्रेससह आणखी काही एक्सप्रेस गाड्यांचा समावेश आहे. कोणत्या गाड्या एलटीटीवर हलवण्यात येणार, याबाबतचा अंतिम निर्णय रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतर जाहीर केला जाणार आहे.
लोकलसाठी अधिक ट्रॅक, अधिक वेळेवर सेवा
या बदलामुळे सकाळच्या गर्दीच्या वेळेत किमान तीन लोकल गाड्यांसाठी अतिरिक्त ट्रॅक उपलब्ध होणार असल्याचा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. त्यामुळे लोकल गाड्यांचे संचलन अधिक नियमित होईल आणि प्रवाशांना होणारा नाहक त्रास कमी होईल.
मुख्य मार्गावरील प्रवाशांना दिलासा
रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळाल्यानंतर हा बदल टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार आहे. हा निर्णय प्रत्यक्षात उतरल्यास मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लाखो लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि मुंबईतील रेल्वे वाहतूक अधिक सुसूत्र होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
