उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर कारवाईची माहिती राज्यातील जनतेला दिली. अक्षयने पोलिसांवर फायरिंग केल्याने तसेच हवेत गोळीबार केल्याने पोलिसांनी संरक्षणार्थ अक्षयवर गोळ्या झाडल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
काहीही ठरवून केलेले नाही : देवेंद्र फडणवीस
advertisement
अक्षय शिंदे याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. अक्षयने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून थेट पोलिसांवरच फायरिंग केले तसेच हवेतही गोळीबार केला. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षयवर गोळीबार केला.
त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी अधिकृत त्याला मृत्यू घोषित केलेले नाही परंतु जी माहिती मिळतीये त्यानुसार त्याचा मृत्यू झालेला असावा. त्यामुळे ठरवून केलेला गोळीबार वगैरे नसून पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणासाठी गोळीबार केलेला आहे.
पोलिसांच्या ताब्यात असताना आरोपीचे हात का बांधले नव्हते? वडेट्टीवारांचा सवाल
दुसरीकडे या संपूर्ण घटनेवर शंका उपस्थित करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी न्यायिक चौकशीची मागणी केली आहे. अक्षय शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? असे एक ना अनेक सवाल विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी विचारले.
बदलापूर प्रकरणात एकीकडे संस्थाचालक भाजपशी संबंधित असताना संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, दुसरीकडे आज आरोपी अक्षय शिंदे स्वतःवर गोळी घालून घेतो हे अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.. बदलापूर प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आमचा पहिल्यापासून विश्वास नाही. आमची मागणी आहे, आता या प्रकरणाची न्यायिक चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
