गोरेगाव- मुलुंड लिंक रोडमुळे मुंबईकरांची ट्रॅफिकमधून सुटका होणार आहे. दरम्यान, हे काम सध्या प्रगतीपथावर असून या पुलासाठी तब्बल 31 खांब उभारण्यात येणार आहेत. यापैकी एकूण 31 खाबांपैकी 27 खांबांची उभारणी पूर्णपणे झाली आहे. हा महत्वाकांक्षी रोड सुरू झाल्यानंतर मुंबईकरांच्या केवळ प्रवासाच्या वेळेतच बचत होणार नाही, तर इंधन वापरातही बचत होईल. शिवाय, मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकात (AQI) सुधारणा होण्यासही मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. लिंक रोड तब्बल 12.20 किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून, मुंबईतील पूर्व- पश्चिम उपनगरांना जोडणारा हा चौथा प्रमुख जोडरस्ता ठरणार आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील नागरिकांना या रस्त्याचा वाहतुकीसाठी मोठा फायदा होणार आहे.
advertisement
प्रकल्पाचा टप्पा 3 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या या उड्डाणपुलाची लांबी 1,265 मीटर असून तो सहापदरी असणार आहे. या बांधकामासाठी बॉक्स गर्डर आणि काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्त्यावर पादचारी पूल आणि स्वयंचलित सरकता जिन्याची (Escalator) सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. उड्डाणपुलाची उभारणी गोरेगाव ते मुलुंड अशी होत आहे. या पुलाची सुरूवात दिंडोशी न्यायालयापासून होते, तर रत्नागिरी जंक्शन येथे 90 अंश कोनात वळतो आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. अलीकडेच, उड्डाणपुलाच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी पालिका मुख्यालयात घेतला. त्यांच्यासोबत प्रमुख अभियंता (पूल) उत्तम श्रोते आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
रत्नागिरी जंक्शन येथे चार खांब उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. तर गर्डर उभारणी, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते इत्यादी कामे पूर्ण करून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी 16 मे 2026 पासून खुला करण्याचे मुंबई महापालिकेचे उद्दिष्ट आहे. सध्या उड्डाणपुलाचे काम प्रगती पथावर असून एकूण 31 खाबांपैकी 27 खांबांची उभारणी पूर्णपणे झाली आहे. पुलाची उभारणी एकूण 26 स्पॅनपैकी 12 स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित 14 स्पॅनचे काम 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. खांब उभारणीनंतर तुळई स्थापित करणे आणि डेक स्लॅब ओतकाम (Casting) ही कामे 15 एप्रिल 2026 पर्यंत केली जातील. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील पोहोच मार्गांचे बांधकाम देखील निश्चित वेळेनुसारच केले जात आहे.
दिंडोशी न्यायालय बाजूकडील मार्गाचे काम 31 जानेवारीपर्यंत, तर दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील मार्गाचे काम 30 एप्रिलपर्यंत पूर्ण केले जाईल. बांधकामानंतरची इतर कामे उर्वरित 15 दिवसांत पूर्ण करून 16 मे 2026 पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे BMC चे ध्येय आहे. मात्र, उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्यात मुलुंड बाजूकडे काही बांधकामांची कामे बाकी आहेत. त्यामुळे, त्या पुलाच्या कामामध्ये बाधित असणाऱ्यांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून ती जागा उपलब्ध होताच त्या भागातील कामाला गती मिळेल, असे महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.