मुंबईकरांचा मालाड ते अंधेरी हा प्रवास आता वाहतूक कोंडीमध्ये होणार नाही. पोयसर नदीवर मुंबई महानगर पालिकेतर्फे बांधण्यात येणार्या पुलामुळे या दोन विभागातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. वाहतूक कोंडीतला प्रवास आणखीनच जलद होणार असून प्रवाशांच्या वेळेतही मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. उत्तर मुंबईतील वाहतूक आणखी सुरळीत व्हावी, यासाठी पालिका हा पूल बांधत आहे. मालाड ते अंधेरी ही पश्चिम उपनगरातील दोन महत्त्वाची व्यापारी आणि निवासी केंद्रे आहेत. अंधेरीत उद्योग आणि व्यावसायिक उलाढाल मोठी आहे. तर मालाडमध्ये आयटी विभाग तसेच चित्रपटांच्या चित्रीकरणाचे स्टुडिओ मोठ्या प्रमाणावर आहेत.
advertisement
अशा कारणांमुळे, मालाड आणि अंधेरी या दोन्हीही विभागांत वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. हे दोन्ही विभाग भौगोलिकदृष्ट्या जवळ आहेत. मात्र, पोयसर नदी आणि मालाड खाडीमुळे ते विभागले आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागांना पर्यायी कनेक्टिव्हिटी नाही. जर हा उड्डाणपूल तयार झाला तर दोन्हीही शहर अधिकच जवळ होतील, या दोन्हीही शहरांतील नागरिकांचा प्रवास आणखीनच सुस्साट होईल. हा पूल मालाडमध्ये असलेल्या इन्फिनिटी मॉलच्या मागून सुरू होईल आणि अंधेरीच्या मागील रस्त्यापर्यंत जाईल. हा रस्ता अंधेरीच्या मध्यभागी आहे. तर इन्फिनिटी मॉल मालाडच्या मुख्य भागात असल्यामुळे य पुलाच्या माध्यमातून वाहनचालकांना या भागात थेट पोहोचता येईल.
दरम्यान, पूल ४०० मीटर लांब आणि ३५ मीटर रुंद असेल आणि दोन्ही बाजूंना प्रत्येकी दोन मार्गिका असतील. या पुलामुळे प्रवास फक्त पाच मिनिटांत पूर्ण करता येणं शक्य झालं आहे. पूल एक हेक्टर तिवरांच्या रानावरून आणि पोयसर नदीवरून जाईल. त्यामुळे महानगर पालिकेला पर्यावरण विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे. पाच वर्षात पुलाचे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. विविध प्रकारच्या परवानग्या, आराखडे आदी कामांमुळे पुलाच्या कामास आधीच विलंब झाला आहे. पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल, यादृष्टीने पुलाचे काम केले जाणार आहे.