ड्रोन, फ्लाइंग कंदील आणि हवाई साधनांवर बंदी
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दरवर्षी दिवाळीच्या काळात फटाक्यांची आतषबाजी, ड्रोन उडवणे आणि फ्लाइंग कंदील उडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडतात. हे दिसायला सुंदर असले तरी त्यातून आगीचा धोका, घातपाताची शक्यता आणि काही वेळा विमानतळ परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
MHADA Home : म्हाडाची मोठी घोषणा! शिल्लक घरांसाठी बंपर लॉटरी; कुठे अन् कधी अर्ज करायचा?वाचा
1) 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2025 दरम्यान
ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरा मोटर्स, हॉट एअर बलून, हॅण्ड ग्लायडर्स इत्यादींच्या उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे.
2) तर 12 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 या कालावधीत
फ्लाइंग कंदील (Sky Lanterns) उडविण्यावर बंदी आहे.
आगीचा आणि घातपाताचा धोका
अनेकदा फ्लाइंग कंदील उंचावर जाऊन इमारतींवर, झाडांवर किंवा विद्युत तारांवर अडकतात आणि त्यातून आग लागण्याचे प्रकार घडतात. काही वेळा हे कंदील विमानांच्या उड्डाणमार्गाजवळ पोहोचल्यास विमानसुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच, काही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून ड्रोनचा गुप्त माहिती मिळवण्यासाठी किंवा एखाद्या नामांकित व्यक्तीवर हल्ला करण्यासाठी दुरुपयोग होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांनी नमूद केली आहे.
मुंबई पोलिसांची दक्षता आणि आवाहन
मुंबई पोलिसांनी या कालावधीत विशेष पथके तयार केली असून, ड्रोन उडवणे किंवा फ्लाइंग कंदील विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळी सण आनंदात साजरा करा, पण नियमांचे पालन करा. कुठलाही धोका पत्करू नका. सार्वजनिक ठिकाणी किंवा वस्ती भागात कंदील, ड्रोन किंवा इतर हवाई साधनांचा वापर टाळा.