रेल्वेकडून विनातिकीट प्रवासाच्या नावाखाली स्थानिकांवर कारवाई
पूल बंद झाल्याने आता नागरिक परळ रेल्वे स्थानकावरील पुलाचा वापर करत आहेत. मात्र, हा पूल केवळ प्रवाशांसाठी असल्याने स्थानिक पादचाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाकडून विनातिकीट प्रवासाच्या नावाखाली दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यामुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान एमएमआरडीएने या पुलाच्या पाडकामाची जबाबदारी महारेल कंपनीकडे सोपविली आहे. पादचारी मार्गिका बंद झाल्याने महारेलने 6 सप्टेंबर रोजी रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून परळ स्थानकावरील मुंबईकडील पुलाचा वापर स्थानिकांना विनातिकीट करण्याची विनंती केली होती. मात्र अद्याप या प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. त्यामुळे रहिवाशांना पूर्व-पश्चिम दिशेने जाण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत आहे. काही जण मात्र अडचणीमुळे रेल्वेपुलाचाच वापर करतात आणि त्यांच्याकडून दंड वसूल होत आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
advertisement
परळ परिसरात एल्फिन्स्टन पूल बंद असल्याने दुसरा पर्याय नाही. पण रेल्वे प्रशासन विनातिकीट प्रवासाच्या नावाखाली रहिवाशांकडून दंड वसूल करत आहे. हा प्रकल्प एमएमआरडीएचा असल्याने त्यांनी तातडीने रेल्वेशी समन्वय साधून पुलाचा वापर स्थानिकांना खुला करावा, अशी मागणी मनसे नेते मंगेश कसालकर यांनी केली आहे. परळ पूल स्थानिक पादचाऱ्यांसाठी तत्काळ खुला करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आंदोलन करण्यात येईल,असा इशाराही त्यांनी दिला आहे. पुलाच्या बंदीमुळे वाढलेली नागरिकांची हालहाकी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे
