मुंबई : एकेकाळी हे शहर गिरणी कामगारांचं म्हणून ओळखलं जायचं, कारण कामगारांनी मुंबईला भरभरून दिलंय. 1932 साली काही गिरणी कामगारांनी एकत्र येऊन गोविंदा पथक सुरू करायचं ठरवलं. त्याकाळी दहीहंडीला पैसे मिळत असत, तेच पैसे आपल्या कुस्तीच्या सरावाला होतील, हा यामागचा उद्देश होता. यातूनच उदयास आलं 'विजयहिंद गोविंदा पथक आणि मंडळ'.
advertisement
मुंबईच्या दादर परिसरात विजयहिंद गोविंदा पथकानं 1932 साली सुरू केलेली दहीहंडीची परंपरा आजही सुरू आहे. या पथकाच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. विशेष म्हणजे एवढ्या वर्षांची परंपरा असली तरी या पथकात अद्यापही कोणी गोविंदा किंवा बाल गोविंदा जखमी झालेला नाही, एवढी तयारीनिशी आणि सर्व गोविंदांची व्यवस्थित काळजी घेऊन ते दहीहंडी खेळतात.
महत्त्वाचं म्हणजे विजयहिंद गोविंदा पथक हे केवळ दहीहंडीपुरतं मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपण्यातही नावाजलेलं आहे. आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, गरजूंना मदत, इत्यादी विविध उपक्रम ते राबवतात. टाटा आणि केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत जेवण आणि इतर सुविधादेखील ते उपलब्ध करतात.
विशेष बाब अशी की, आज विजयहिंद गोविंदा पथकातील अनेक तरुण ही गिरणी कामगारांची मुलं आहेत. हा केवळ गोविंदा पथक नसून आपल्या पूर्वजांचा वारसा आणि मराठी सण-उत्सव जपणाऱ्या गिरणी कामगारांचा वंश आहे, असं इथले तरुण मानतात. त्यांचा थरांचा कोणताही अट्टाहास नसतो, इतरांशी त्यांची स्पर्धाही नसते. सण हा सणासारखा साजरा व्हायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे. शिवाय वर्षानुवर्षे परंपरेसह सामाजिक बांधिलकी जपून या पथकानं सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.