कधी पासून असणार वाहतूक बदल?
मुंबई- नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम एमएसआरडीसी सुरू आहे. या कामाअंतर्गत खारेगाव भुयारी मार्गावर महत्त्वाची कामे केली जाणार असल्याने उद्यापासून म्हणजेच 15 डिसेंबरपासून पुढील चार महिन्यांसाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
जाणून घ्या पर्यायी?
भिवंडी, कळवा, ठाणे, कल्याण तसेच नवी मुंबईकडे जाणारी हजारो वाहने दररोज मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करतात. मागील काही वर्षांपासून या महामार्गावरील माजिवडा ते वडपे दरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून आता खारेगाव भुयारी मार्ग परिसरात कामाचा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी वाहतूक बदल लागू केले आहेत.
खारेगाव भुयारी मार्गाने खारेगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना या भुयारी मार्गात प्रवेश करता येणार नाही. ही वाहने खारेगाव टोलनाका, गॅमन रोड आणि पारसिक चौक मार्गे किंवा साकेत येथून खाडी पुलावरून मार्गक्रमण करतील.
तसेच खारेगाव भुयारी मार्गावरून मुंबई-नाशिक महामार्गाने भिवंडी किंवा ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेशबंदी राहणार आहे. भिवंडीकडे जाणारी वाहने खारेगाव, पारसिक चौक आणि गॅमन रोड मार्गे जातील तर ठाण्याकडे जाणारी वाहने कळवा खाडी पुलाचा वापर करतील.
