सिनेरसिकांसाठी पर्वणी! ‘अजिंठा-वेरूळ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर, कधी सुरू होणार?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Ajanta Ellora Film Festival: यंदाच्या महोत्सवात ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. अजिंठा–वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 11 व्या पर्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 या कालावधीत हा भव्य चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. देश-विदेशातील नामवंत कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ या निमित्ताने छत्रपती संभाजीनगरमध्ये एकत्र येणार आहेत.
एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृह आणि प्रोझोन मॉलमधील आयनॉक्स थिएटर येथे हा पाच दिवसीय महोत्सव होणार आहे. जागतिक दर्जाचे चित्रपट मराठवाड्यातील प्रेक्षकांना अनुभवता यावेत, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित केला जात आहे.
advertisement
केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता, छत्रपती संभाजीनगरला सांस्कृतिक केंद्र आणि फिल्म प्रोडक्शन हब म्हणून जागतिक नकाशावर स्थान मिळवून देणे, हे या उपक्रमामागील महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
चित्रपट क्षेत्रातील नवोदित कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि सिनेमाची आवड असलेल्या तरुणांसाठी हा महोत्सव एक व्यासपीठ ठरणार असून, त्यांच्या कलात्मक आणि तांत्रिक क्षमतेला चालना मिळेल. त्याचबरोबर, शहरातील पर्यटनाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचा हेतूही या आयोजनातून साध्य केला जाणार आहे.
advertisement
यंदाच्या महोत्सवात ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ आणि ‘सुवर्ण कैलास सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच भारतीय चित्रपट स्पर्धा, जागतिक चित्रपट विभाग, पोस्टर प्रदर्शन, रेट्रोस्पेक्टिव्ह, ट्रिब्यूट कार्यक्रम, मास्टर क्लास, व्याख्याने, विशेष स्क्रिनिंग आणि परिसंवाद यांसारख्या अनेक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 14, 2025 10:53 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
सिनेरसिकांसाठी पर्वणी! ‘अजिंठा-वेरूळ’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर, कधी सुरू होणार?








