मुंबईत लालबागचा राजा, चिचपोकळीचा चिंतामणी यांसारख्या प्रसिद्ध गणपतींच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. त्यामुळे चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कडर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे आणि पनवेल या स्थानकांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना सहजपणे तिकीट मिळावे यासाठी 30 मोबाइल-यूटीएस यंत्रणा वितरित करण्यात आल्या असून चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर 27 ऑगस्टपासून प्रत्येकी दोन अतिरिक्त यूटीएस खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत.
advertisement
प्रवासी व्यवस्थापनासाठी 180 तिकीट तपासणी कर्मचारी विविध स्थानकांवर तैनात करण्यात आले असून गर्दी नियंत्रणासाठी विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे आणि पनवेल या प्रमुख स्थानकांवर 30 ऑगस्टपर्यंत व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गणेशोत्सव विशेष गाड्यांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी प्रमुख स्थानकांवर सूचना फलक, नियमित उद्घोषणा आणि चौकशी केंद्रांवर माहिती देण्याची सोय करण्यात आली आहे. या गाड्यांचे वेळापत्रक रेल्वेच्या IRCTC संकेतस्थळावर, एनटीईएस अॅप, रेलवन अॅप आणि पीआरएस केंद्रांवर उपलब्ध आहे.
मध्य रेल्वेच्या या व्यापक उपाययोजनांमुळे यंदाचा गणेशोत्सव अधिक सुगम, सुसूत्र व सुरक्षित होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.