प्रवासात जेवण घ्यायचं नसेल तरीही द्यावंच लागेल पैसे?
या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण आता प्रवाशांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रेल्वे जेवणासाठी 300 ते 400 रुपयांपर्यंत अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाइट किंवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुक करताना प्रवाशांना ''नो मील'' हा पर्याय निवडण्याची मुभा होती. ज्यांना प्रवासादरम्यान रेल्वेचे जेवण नको असेल ते हा पर्याय निवडून फक्त सीटचे तिकीट खरेदी करू शकत होते. मात्र आता हा पर्याय पूर्णपणे दिसत नसल्यामुळे प्रवाशांना गरज नसतानाही अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे.
advertisement
प्रवाशांनी सोशल मीडियावर या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अनेक प्रवाशांनी एक्सवर पोस्ट करत आयआरसीटीसीवर प्रवाशांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. मी फक्त तीन तासांसाठी प्रवास करणार आहे, तरीही मला जेवणासह तिकीट खरेदी करावं लागलं. हा प्रवाशांच्या खिशावर दरोडा आहे,असे एका प्रवाशाने ट्वीट केले आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार,नो फू हा पर्याय पूर्णपणे हटवलेला नाही, तर त्याची जागा बदलण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, हा पर्याय अजूनही तिकीट बुकिंग पेजवर आहे, पण थोडं खाली स्क्रोल केल्यावर तो दिसतो. त्यामुळे अनेक प्रवाशांना तो लगेच दिसत नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
